लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली व भंडारा जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिली.
कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे सांगली व भंडारा जिल्ह्यात सतत कोरोनाच्या आढावा बैठका घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. येथील आढावा बैठकीत प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाल्याची बाब त्यांना कळाली. तसेच ऑक्सिजनचा साठाही रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे त्यांना समजले.
त्यामुळे मंत्री कदम यांनी याबाबत तातडीने पावले उचलली. त्यांनी मंगळवारी मुंबईमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. यावेळी मंत्री कदम यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. काही रुग्णालयांत रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजन साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडथळे येत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करताना धावपळ होत आहे. त्यामुळे सांगली व भंडारा जिल्ह्यासाठी ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा जास्तीत जास्त पुरवठा करावा, अशी विनंती केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सांगली आणि भंडारा जिल्ह्यासाठी ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा अजिबात तुटवडा भासू देणार नाही. लवकरच पुरेसा साठा दिला जाणार आहे, अशी ग्वाही दिली.