सांगली : विश्रामबाग येथील स. नं. ३६३/२ मधील जागेवर माध्यमिक शाळा व क्रीडांगणाचे आरक्षण आहे. हे आरक्षण कायम ठेवण्यासाठी महापालिकास्तरावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी शुक्रवारी दिली. आमदार गाडगीळ यांनी या आरक्षित जागेची पाहणी केली. यावेळी माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी यांच्यासोबत स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे संचालक, शिक्षक व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विजय नामजोशी म्हणाले, माध्यमिक शाळा व क्रीडांगणाचे आरक्षण असलेली ही जागा शासनाने ताब्यात घेतल्यानंतर कब्जेपट्टीने संस्थेच्या नावे केली होती. त्यावर संस्थेचा सलग १३ वर्षे कब्जा व ताबा होता. मात्र, शासनाने कोणतेही कारण न देता ही जागा काढून घेतली आहे. आता आरक्षण उठवून ही जागा रहिवासी क्षेत्रात समाविष्ट केली जाणार आहे. या लढ्यात आमदारांनी पाठीशी राहावे, असे आवाहन केले. गाडगीळ यांनीही संस्थेच्या पाठीशी बळ उभे करण्याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेचे संचालक विनायक वझे, भास्कर कुलकर्णी, जयंत चितळे, माधव कुलकर्णी, सुनील देशपांडे, मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी, महादेव कुंभार उपस्थित होते.
फोटो-१५शितल१
फोटो ओळी :- विश्रामबाग येथील आरक्षित भूखंडाची आमदार सुधीर गाडगीळ यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी धीरज सूर्यवंशी, संजय कुलकर्णी, विजय नामजोशी उपस्थित होते.