सांगली : महापालिकेच्या कारभारात आजअखेर लक्ष घातले नाही, ही चूकच झाली. आता काय बिघडले, त्याची माहिती घेऊन दुरूस्त करू, असे काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी नगरसेवकांनी मिरज पॅटर्नच्या कारभाराबद्दल तक्रारीचा सूर आळवला. महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांची बैठक कदम यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पालिकेच्या कारभारावर चर्चा झाली. विवेक कांबळे महापौर झाल्यापासून काँग्रेसमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यांच्या व्यक्तव्याने काँग्रेस बदनाम झाल्याची टिपणीही कदम यांनी बैठकीत केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, सांगलीच्या जनतेने मोठ्या विश्वासाने सत्ता सोपविली आहे. स्वच्छ कारभारापेक्षा पेपरबाजीच जादा झाली. यापुढे दर महिन्याला काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेणार आहोत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. महापालिकेची आर्थिक स्थिती काय आहे, याची माहिती घेऊन विकास कामांचे नियोजन केले जाईल. प्रसंगी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करू. मंत्रालयात नगरविकास व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सांगलीतच काम केलेले आहेत. त्यामुळे तिथे कोणतीही अडचण येणार नाही. आजपर्यंत पालिकेच्या कारभारात लक्ष घातले नाही, ही चूकच झाली. यापुढे नगरसेवकांची मते जाणून घेऊ, असेही कदम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नऐकायचे कुणाचे?या बैठकीत आ. कदम यांनी नगरसेवकांना काही सूचना केल्या. पालिकेत इद्रिस नायकवडी यांचे ऐका, असा आदेश देताना पुन्हा थोड्यावेळात त्यांनी किशोर जामदार यांच्याकडे निर्देश केले. जामदार यांचेही ऐकले पाहिजे, अशी सूचना केली. त्यावर सांगलीच्या नगरसेवकांनी ‘ साहेब, नेमके कुणाचे ऐकायचे ते सांगा’, असे म्हणत दोघेही एकच आहेत. हाच मिरज पॅटर्न असून तो आजपर्यंत आम्हालाही समजला नाही, असा उपरोधिक टोला लगाविला.
महापालिकेत काय बिघडलंय ते दुरूस्त करू
By admin | Published: July 08, 2015 11:56 PM