सांगली : महापालिकेतील मानधन, बदली, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासह सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.
महापालिका कामगार सभेच्या वतीने महापौर सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सूर्यवंशी म्हणाले की, महापालिकेच्या आकृतिबंधामध्ये मानधन, बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. बदली कर्मचाऱ्यांना २६ दिवस काम देण्याचा प्रश्न निकाली काढू. सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या खुल्या जागांवर निवारा शेड व प्राथमिक गरजांसाठी तात्पुरती सोय करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव दिलीप शिंदे, अस्लम महात यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. गीताताई ठाकर यांनी स्वागत केले, तर विजय तांबडे यांनी आभार मानले. यावेळी सचिन माळवदकर, अभय पोळ, एकनाथ माळी, जावेद सय्यद, रियाज नायकवडी आदींसह कामगार उपस्थित होते.