प्रथम सत्रात नीलेश जाधव यांनी विहीर व विंधन विहिरींचे कृत्रिम पुनर्भरण व जलचक्राचे महत्त्व विशद केले. छतावरील पाऊस, पाणी संकलन, गाळाच्या भूप्रस्तरातील रिचार्ज शाफ्ट, सायपन पद्धती, ट्रेंचेस, इंजेक्शन वेल याद्वारे भूजलाचे पुनर्भरण करता येऊ शकते, याबाबत माहिती देऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व सांगितले. द्वितीय सत्रात सचिन पाटील यांनी भूपृष्ठावरील पाणी, भूगर्भातील पाणी या पिण्याच्या पाण्याच्या स्रोत, सुरक्षित व शुद्ध पाणी ही संकल्पना सांगितली. अनुजीव शास्त्रीय तपासणी, रासायनिक तपासणी या पिण्याच्या पाण्याच्या प्रयोगशाळेतील तपासण्या व पाणी निर्जंतुक करण्यासाठी आवश्यक आर्थोटोल्यूडीन चाचणीची माहिती दिली.
वेबिनारच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी होत्या. प्रा. डॉ. सागर लटके-पाटील व डॉ. विनायक पवार यांनी स्वागत केले. प्रा. जी. बी. चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. वेबिनारमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक अभय जायभाय, संस्थेचे सचिव राजू झाडबुके, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, स्वयंसेविका उपस्थित होत्या. प्रा. विश्वनाथ व्हनमोरे यांनी तांत्रिक सहकार्य केले. प्रा. तुषार पाटील, प्रा. शबाना हळगळी यांनी आभार मानले. प्रा. चारुशीला तासगावे यांनी सूत्रसंचालन केले.