सांगली : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या तिसऱ्या स्तरातील निर्बंधानुसार आजपासून दोन दिवस ‘वीकेंड लॉकडाऊन’ असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा शनिवारी व रविवारी बंद राहणार आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यातील ६.८७ या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत या आठवड्यात तो ८.१० टक्के झाला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या स्थिर होत असल्याने राज्य शासनाने अनलॉकची घोषणा केली आहे. त्यात पाच स्तरात विभागणी करण्यात आली असून जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश आहे. यामुळे दुपारी चारपर्यंत सर्व व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. चारनंतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचवेळी शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर करतानाच वीकेंड लॉकडाऊनचीही घोषणा केली होती.
त्यामुळे आता दोन्ही दिवस भाजीपाला, दूध, किराणा, आदी सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय दोन दिवसांसाठी बंद राहणार आहेत. दोन दिवस संपूर्ण बाजारपेठेसह इतर व्यवहार बंद ठेवावेत व लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
पॉझिटिव्हिटी रेट वाढला
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्क्यांवर आल्याने दिलासा मिळाला होता. त्यामुळे तिसऱ्या स्तरातील समावेशही झाला होता. या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांखाली येण्याची अपेक्षा होती मात्र, गेल्या आठवड्यापेक्षा यावेळी वाढ झाली आहे. प्रशासनाने वाढविलेल्या चाचण्यांच्या प्रमाणामुळेही वाढ झाल्याची शक्यता असली तरी हा दर पुन्हा दहा टक्क्यांजवळ गेल्याने चिंता वाढली आहे.
चौकट
तिसऱ्या स्तरातील नियमावलीस मुदतवाढ
शासनाच्या निर्देशानुसार पाच टक्क्यांपेक्षा जादा व दहा टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरातील समावेश या आठवड्यातही कायम राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले. २८ जूनपर्यंत तिसऱ्या स्तरातील नियमावली कायम राहणार आहे. प्रशासनाने लागू केलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.