फोटो : बावची (ता. वाळवा) येथील आठवडा बाजार येडेनिपाणी-आष्टा रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची सतत कोंडी होत असते.
प्रतापसिंह माने
गोटखिंडी :
बावची (ता. वाळवा) येथील आठवडा बाजार शिराळा-आष्टा रस्त्यालगतच भरत असतो. प्रशासनाचे दुर्लक्ष, आपला माल विक्री व्हावा म्हणून व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला मांडलेले ठाण आणि ग्राहकांची होणारी गर्दी यामुळे हा बाजार वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवाय सध्या आरोग्याबाबत वाढणाऱ्या समस्यांचा विचार करता, रस्त्यावरील बाजार धाेकादायकच असल्याचे चित्र आहे.
बावची ग्रामपंचायतीने कृषी व पणन विभागाकडून गावच्या पूर्वबाजूस बाजार कट्टे बनवले. पण जागेचा अभाव असल्याने बाजार कट्टे मर्यादितच तयार झाले. गावची लोकसंख्या व परिसरातील विक्रेते, ग्राहकांची संख्या वाढत आहे. बाजारातील विक्रेत्यांकडून ग्रामपंचायत ५, १० रुपये आकारणी करते. ती वसुली ठेकापध्दतीने ठेकेदाराकडे दिली गेली आहे. संबंधित ठेकेदार फक्त वसुलीवर भर देत आहेत. मात्र येथील सुविधांकडे त्याचे लक्ष नाही.
शिराळा-आष्टा हा मार्ग शिराळा व येडेनिपाणी परिसरातील नागरिकांना सांगलीला ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग आहे. यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ असते. बावचीतील आठवडी बाजारादिवशी सायंकाळी काही विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. याचा विचार करून ग्रामपंचायत व पोलिसांनी रस्त्यावरील बाजार बंद करून रस्ता वाहतुकीस खुला रहावा, अशी व्यवस्था करण्याची मागणी वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.
चाैकट
प्रशासनाचे दुर्लक्ष
बावचीत बाजार भरतो, त्या ठिकाणाहून पश्चिम बाजूस व हनुमान मंदिर परिसरातही पूर्वी बाजार भरत होता. त्या ठिकाणी वाढीव विक्रेते व ग्राहकांना जर सुविधा दिली, तर रस्त्यावर बाजार भरणार नाही. रस्ता खुला राहून वाहतूक सुरळीत राहील. परंतु याकडे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.