लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करून सर्व व्यवहार दुपारी चारपर्यंत सुरू झाले आहेत. यात आठवडी बाजाराला अजूनही परवानगी दिलेली नाही. तरीही भाजी विक्रेत्यांनी शहरातील विविध ठिकाणी ठाण मांडले आहे. या भाजी विक्रेत्यांकडे ग्राहकांची दिवसभर गर्दी असते. दोघांनाही कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते.
महापालिका क्षेत्रात दर आठवड्याला २५ हून अधिक ठिकाणी आठवडा बाजार भरतो. जवळपास पाच ते सहा हजार विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करतात. कोरोनामुळे आठवडी बाजार बंद करण्यात आला. अनलाॅकनंतरही अजूनही आठवडी बाजाराला परवानगी दिलेली नाही. केवळ अधिकृत भाजी मंडई सुरू करण्यात आली आहे. तरीही भाजी व फळ विक्रेत्यांनी चौकाचौकात स्टाॅल लावले आहेत. काहीजण हातगाड्यांवरून भाजीपाला विक्री करीत आहेत. या ठिकाणी सकाळपासून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी असते. यातील अनेकांनी मास्क घातले नसल्याचे दिसून आले. सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिकही विनामास्कच खरेदीसाठी येत होते. सोशल डिस्टन्सिंगचा विसरच साऱ्यांनाच पडला आहे. या साऱ्यावर नियंत्रण ठेवणारी महापालिका व पोलिसांची यंत्रणाही बाजारपेठेत दिसत नव्हती.
चौकट
शिवाजी मंडई, मारुती रोडवर ग्राहकांची गर्दी
छत्रपती शिवाजी मंडईत भाजी विक्री सुरू झाली आहे. तरीही अनेक विक्रेते मारुती रोडवरही ठाण मांडून आहेत. या दोन्ही ठिकाणी ग्राहकांची दिवसभर गर्दी असते. अनेक विक्रेते विनामास्कच असतात. काहींनी नाकाखाली मास्क घेतला होता. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होत नव्हते.
चौकट
पेठभाग मंडईत मास्कचा विसर
पेठभागातील सर्वात जुनी भाजी मंडई आहे. अनलाॅकमध्ये बाजार सुरू करण्यास परवानगी दिली. पण तिथेही विक्रेते व ग्राहक या दोघांनाही मास्कचा विसर पडल्याचे दिसत होते. नागरिकही बेफिकीरपणे वागत होते.
चौकट
चांदणी चौक, विश्रामबाग चौकात फुलला बाजार
शहरातील चांदणी चौक व विश्रामबाग चौकातील आठवडा बाजार बंद असला तरी बहुतांश विक्रेते रस्त्यावर बसलेले असतात. त्यामुळे या चौकातील आठवडा बाजाराचाच फिल आहे. भाजीपाला खरेदीसाठी पूर्वीप्रमाणेच गर्दी होत आहे. इथेही ना मास्कचा वापर, ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसते.
चौकट
महापालिकेची पथके गायब
कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त पथक नियुक्त केले होते. या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. पण अनलाॅकनंतर ही पथकेही गायब झाली आहेत.
चौकट
कोट
महापालिका क्षेत्रात अजून आठवडा बाजाराला परवानगी दिलेली नाही. पाॅझिटिव्हिटी दर अधिक आहे. अधिकृत भाजी मंडई सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोरोना नियमांचे पालन करून भाजीपाला, फळे खरेदी करावीत. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे. - राहुल रोकडे, उपायुक्त, महापालिका