वांगी : जिल्हाधिकारी आदेशानुसार स्थापन केलेले भरारी पथकप्रमुख तहसीदार डॉ. शैलजा पाटील याच्या पथकाने वांगी (ता. कडेगांव) डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी केली. या पथकाने वजनकाटा निर्दोष असलेचा तपासणी अहवाल कारखाना प्रशासनाकडे सादर केला, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी दिली.
ते म्हणाले की, आपला कारखाना स्थापनेपासून कार्यक्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, सभासद हित जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. या भरारी पथकाच्या प्रमुख तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी कारखान्याच्या वजनकाट्यास त्यांच्या भरारी पथकासह अचानक भेट दिली. यावेळी वजनकाट्यावर उसासह वाहनाचे वजन करून नंतर मोकळी वाहने वजनकाट्यावर घेतली. यावेळी सर्वांसमक्ष वजने तपासली असता वाहनाचे वजन व ऊस वजने बरोबर असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार या भरारी पथकाने प्रत्यक्ष सह्या करून कारखान्याचा वजनकाटा निर्दोष असल्याचा तपासणी अहवाल सादर केला.
तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी, बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंद केलेला सर्व ऊस गळितासाठी नि:संकोचपणे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव महिंद, संचालक रघुनाथराव कदम, बापूसाहेब पाटील, निवृत्ती जगदाळे, दिलीपराव सूर्यवंशी आणि कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते.