तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. १६ तारखेला नगराध्यक्ष पदावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी चुरस असल्याने खासदार संजयकाका पाटील कोणाला संधी देणार, याची उत्सुकता होती. खासदार संजयकाका पाटील यांनी तासगावच्या पाटलांच्या पारड्यात वजन टाकल्याचे स्पष्ट झाले, तर काही इच्छुक नगरसेवकांची नाराजीही दिसून आली.तासगाव नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपकडून पहिल्यांदा सुशिला साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नव्याने नगराध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. नगरसेवक बाबासाहेब पाटील आणि नगरसेवक अविनाश पाटील यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी जोरदार चुरस होती. काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरु केले होते. त्यामुळे खासदारांच्या निर्णयाकडे नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले होते. गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी खासदार संजयकाकांच्या सूचनेनुसार नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एकमेव बाबासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल झाला. नगरसेविका सुशिला साळुंखे या सूचक होत्या, तर शिल्पा धोत्रे यांनी अनुमोदन दिले. अर्ज दाखल करताना जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील, पक्षप्रतोद प्रताप पाटील यांच्यासह भाजपचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते, तर नाराज नगरसेवकांनी मात्र पाठ फिरवली. (वार्ताहर)४भाजपचे बाबासाहेब पाटील नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिकेत आले असताना, काका गटाचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. मात्र नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असणाऱ्या नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक शरद मानकर, नगरसेवक राजेंद्र म्हेत्रे यांनी नगरपालिकेकडे पाठ फिरवली. त्यांच्या नाराजीची चर्चा होती.‘लोकमत’चा अचूक अंदाज नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकांत जोरदार चुरस होती. खासदार संजयकाका कोणाचे नाव जाहीर करणार, याची नगरसेवकांसह नागरिकांतही उत्सुकता होती. मात्र तत्कालीन नगराध्यक्षा सुशिला साळुंखे यांनी राजीनामा सादर केल्यानंतर, सर्वप्रथम ‘लोकमत’ने नगराध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची वर्णी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तो अचूक आणि खरा ठरला.
बाबासाहेबांच्या पारड्यात काकांचे वजन
By admin | Published: December 11, 2015 12:13 AM