महेंद्र किणीकर ।वाळवा (जि. सांगली) : येथील प्रगतशील शेतकरी विजय मगदूम (वस्ताद) यांनी शनिवारी नातीच्या जन्माचे अनोखे स्वागत केले. नातीला जैन मंदिरापासून घरापर्यंत पूर्ण रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालून, प्रचंड फटाक्यांची आतषबाजी करीत नेण्यात आले. यावेळी महिलांनी हातात ‘माझी मुलगी, माझा अभिमान’, बेटी को जो दे पहचान, वही परिवार है महान’, ‘लेक लाडकी या घरची’ असे फलक घेतले होते, तर सजविलेल्या पाळण्यात घालून नातीचा सवाद्य गृहप्रवेश घडवण्यात आला.
येथील कोटभागमधील विजय मगदूम यांचे पुत्र आशिष व आदिती या दाम्पत्याला पाच महिन्यांपूर्वी मुलगी झाली. आदिती यांचे बाळंतपण त्यांच्या माहेरी झाले. त्या पाच महिन्यांनी शनिवारी सासरी आल्या. मुलीचे नाव ठेवण्यापासून ती घरी येईपर्यंत तिचे कोडकौतुक करण्यात आले. तिचे नाव सिद्धी ठेवण्यात आले. सिद्धी व तिची आई आदिती मुहूर्तानुसार बाळंतविड्यासह वाळव्यात आल्या. त्यांचे आगमन होताच विजय मगदूम यांनी नातीच्या स्वागतासाठी कोटभाग येथील जैन मंदिरापासून ते घरापर्यंत पूर्ण मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या. सजविलेला पाळणा आणला. त्यात नातीला घालून महिलांची रॅली काढण्यात आली.
‘बेटी को अधिकार दो - बेटे जैसा प्यार दो’, ‘माझी मुलगी, माझा अभिमान’, ‘लेक लाडकी या घरची’ असे फलक हाती घेऊन महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी असलेल्या सांगली जिल्ह्यात विजय मगदूम यांनी नातीच्या जन्माचे अनोखे स्वागत करून आदर्श घालून दिला आहे. यावेळी उद्योगपती रघुनाथ पाटील, हुतात्मा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र तथा अशोक मगदूम, प्रकाश होरे, राजेंद्र पेशवे उपस्थित होते.वाळव्यातील प्रगतशील शेतकरी विजय मगदूम यांनी नातीच्या जन्माच्या स्वागतासाठी कोटभाग येथील जैन मंदिरापासून ते घरापर्यंत पूर्ण मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या व सजविलेल्या पाळण्यात नातीला घालून महिलांनी रॅली काढली. .....भाग्यशाली नात सिद्धी.