सांगली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निकालात सांगलीतील स्वागत राजकुमार पाटील व जत तालुक्यातील गणेश महादेव टेंगले यांनी बाजी मारली आहे. पाटील याला ४८६ वी तर टेंगले याला ६१४ वी रॅँक मिळाली आहे. पाटील येथील राजर्षी शाहू कृषी महाविद्यालयातील प्रा. आर. जे. पाटील यांचा तो मुलगा आहे.स्वागतचे प्राथमिक शिक्षण कसबे डिग्रजला, तर एक वर्ष मालू हायस्कूलला झाल्यानंतर सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील कांतिलाल पुरूषोत्तम शहा प्रशालेत मराठी माध्यमातून झाले. अकरावी व बारावी विलिंग्डन महाविद्यालयातून झाल्यानंतर त्याने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान विषयातून बी. टेक्.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या चार वर्षांपासून तो दिल्ली येथे युपीएससीची तयारी करत होता. हा त्याचा तिसरा प्रयत्न होता. अखेर शुक्रवारी त्याच्या प्रयत्नाला यश मिळत त्याने परीक्षेत बाजी मारली.स्वागतच्या यशाबद्दल त्याचे वडील प्रा. आर. जे पाटील म्हणाले की, मराठी माध्यमातून शिकणाऱ्या अनेकांना न्यूनगंड वाटत होता. मात्र, आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी टक्का वाढत आहे. सध्या मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांचे आकर्षण वाढत असून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे स्वागतने दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातूनच आलेल्या स्वागतचे यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.गणेश टेंगले याने दुष्काळाचा सामना करत झालेले शिक्षण आणि ऊसतोड मजुराचा मुलगा असलेल्या गणेशच्या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.गणेशचे बारावीपर्यंतचे शिक्षण दरीबडची येथे झाले, तर त्यानंतर कोल्हापूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. तीन प्रयत्नानंतर त्याला यश मिळाले आहे. गणेशचे भाऊ तानाजी महादेव टेंगले हे औरंगाबाद जिल्'ात प्राथमिक शिक्षक असून अत्यंत कष्टातून दोघांनीही शिक्षण पूर्ण केले आहे.
स्वागत पाटील, गणेश टेंगलेची यूपीएससीत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:52 PM