लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जन्मजातच मूकबधिर असलेल्या सिद्धार्थ शशिकांत कलगुटगी याने काठमांडू (नेपाळ) येथे नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत देऊन सुवर्णपदक पटकावले. शहराबरोबरच तो राहत असलेल्या वडर गल्लीत फुलांचा वर्षाव करीत त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वडर गल्लीत राहणारा सिद्धार्थ शशिकांत कलगुटगी हा जन्मजातच मूकबधिर आहे. त्याची आईदेखील मूकबधिर आहे. ती धुणीभांडी करून आपल्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करते, तर सिद्धार्थचे वडील शशिकांत हे मजुरीचे काम करतात. सिद्धार्थ कलगुटगी याने काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेतला. १५ ते २० किलो वजनी गटात अत्यंत जिद्दीने त्याने आपल्या प्रतिस्पर्धीला धूळ चारली. भूतान, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि मलेशिया आदी देशांमधील पाचशेहून अधिक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता. सिद्धार्थचे प्रशिक्षक हमजेखान मुजावर यांनी सम्राट व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर त्याला प्रशिक्षण दिले. त्याच्या मोबदल्यात एक पैसाही त्यांनी घेतला नाही. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. राममंदिर चौकापासून वडर गल्लीपर्यंत त्याची मिरवणूक काढण्यात आले. डॉ. सतीश नाईक तसेच महिलांनी त्याला पेढा भरविला. त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. माजी आमदार नितीन शिंदे, मी वडार महाराष्ट्राचा शहर जिल्हाध्यक्ष अमर निंबाळकर, सुजित राऊत, तोफिक शिकलगार, विशाल कलगुटगी, रवी कलगुटगी उपस्थित होते.