ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 20 - कळंबी येथे विहिरीत उडी मारताना मामा-भाच्याची टक्कर होऊन बुडाल्याने शकील म्हमुलाल सनदी (वय १२) या मुलाचा मृत्यू झाला. दस्तगीर तनवीर मुजावर (वय १८,रा. कळंबी) हा युवक जखमी झाला. शकील सनदी याचा मृतदेह चार तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला.
कळंबीत शनिवारी दुपारी शकील सनदी व दस्तगीर मुजावर हे चुलत मामा-भाचे त्यांच्या ८ ते १० साथीदारांसोबत गावाजवळ यल्लम्मा मंदिराशेजारी असलेल्या बाळासाहेब पाटील यांच्या शेतातील विहिरीत पोहोण्यासाठी गेले होते. पोहोताना दस्तगीर मुजावर याने विहिरीच्या काठावरून उडी मारल्यानंतर याचवेळी विहिरीतील पाय-यांवरून उडी मारणा-या शकील सनदी याच्यांशी धडक झाली.
यामुळे शकील हा पाण्यात बुडाला. दोघांच्या धडकेमुळे दस्तगीरच्या डोक्याला दुखापत होऊन रक्त आले. दस्तगीर जखमी झाल्याने विहिरीत पोहोणारे सर्वजण त्याच्याभोवती जमा झाले. यावेळी शकील पाण्यात बुडाल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. थोड्या वेळानंतर शकील पाण्यात बुडाल्याचे समजल्यानंतर सर्वांची धावपळ उडाली. सुमारे ३० फूट खोल पाण्यात गाळात रूतून बसल्याने शकील सनदी याचा मृत्यू झाला.
विहिरीतील तळाशी असलेला शकीलचा मृतदेह काढण्यासाठी सुमारे चार तास प्रयत्न सुरू होते. सांगलीतील जीवरक्षक दलाचे महंमद तांबोळी, अमन तांबोळी, इस्माईल आत्तार, युवराज कदम, श्रीपाद मद्रासी यांनी हुकच्या सहाय्याने सायंकाळी पाच वाजता शकीलचा मृतदेह बाहेर काढला. गावातील शाळेत सहावीत शिकणारा शकील व दस्तगीर दररोज विहिरीत पोहोण्यासाठी जात होते. शकीलचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. शकील विहिरीत बुडाल्याने विहिरीजवळ ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. जखमी दस्तगीर मुजावर याच्यावर मिरजेत खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.