जालिंदर शिंदे ल्ल घाटनांद्रेकवठेमहांकाळ तालुक्यातील लघुप्रकल्प तलावातील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली असून अकरापैकी केवळ पाच तलावात मृतसंचय पाणीसाठा असून, एक तलाव कोरडा, तर उर्वरित पाच तलावांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळा तीव्र होण्याची शक्यता असून आतापासूनच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.यावर्षाच्या अवर्षणाने तालुक्यातील विहिरी, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडले असून कूपनलिकांनी तळ गाठला आहे. तलावात उपलब्ध असणारा पाणीसाठाही हळूहळू कमी होत चालला आहे. तालुक्यातील तीन तलावांमधील पाणीसाठा केवळ महिनाभर पुरेल इतकाच राहिला आहे. तसेच केवळ दोन तलावातीलच पाणी टिकून आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचीही परिस्थिती गंभीर बनणार आहे, असे चित्र आहे. तालुक्यातील अकरा तलावांपैकी लांडगेवाडी, लंगरपेठ, हरोली, दुधेभावी, घोरपडी या पाच तलावांमध्ये मृतसंचय पाणीसाठा आहे. बोरगाव तलाव कोरडा आहे, तर उर्वरित पाच तलावात कुची (३ टक्के), रायवाडी (३१ टक्के), नांगोळे (१८ टक्के), बंडगरवाडी (२३ टक्के), मध्यम प्रकल्प (बसाप्पावाडी - ५० टक्केपेक्षा कमी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन चालू झाल्याने तालुक्यातील काही भागास लाभ होईल. परंतु तालुक्यातील बऱ्याचअंशी भाग अद्याप जलसिंचन योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पुढील तीन महिन्यांचा कालावधी कसा जाणार, तसेच शेती, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचे काय होणार?, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरु आहे. काही भागात कोणत्याही जलसिंचन योजनांचा लाभ न मिळाल्याने तेथेही द्राक्ष व डाळिंब पिकाचे क्षेत्र मोठे आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीतही कमालीची घट झाली असून पावसाविना नैसर्गिकरित्या निर्माण होणारा चारा निर्माण न झाल्याने जनावरांचेही चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चारा छावणी किंवा चारा डेपो सुरु करण्याची मागणी करु लागला आहे. शेतीतील उभे पीक जतन करण्यासाठी कूपनलिका खोदून नशीब अजमावण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकंदरीत दुष्काळाची छाया गडद बनली आहे. रब्बीबरोबर खरीपही वाया गेल्याने, तसेच चारा व पाणीसाठा नसल्याने त्याचा मोठा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाला आहे.
विहिरी, तलाव कोरडे ठणठणीत
By admin | Published: February 24, 2016 12:45 AM