सांगली : व्हेल माशांच्या उलटी तस्करीतील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर (४२, रा. तळाशील, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याचा बनाव उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. सांगलीपोलिसांनीसिंधुदुर्गमधून शिताफीने नीलेशला पकडले.व्हेल माशाच्या उलटी तस्करीप्रकरणी सांगलीत सलीम गुलाब पटेल (४९, रा. खणभाग), अकबर याकूब शेख (५१, रा. पिंगोळी, मुस्लीमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीत पोलिसांनी अकबर शेख याची कसून चौकशी केली. त्याने मुद्देमाल तळाशील (मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील नीलेश रेवणकर याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे समोर आले. तपासासाठी सांगली पोलिसाचे पथक सिंधुदुर्गकडे रवाना झाले. दरम्यान गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर यास शिताफीने पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी उर्वरित १८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा अंदाजे १८ कोटी ६० किमतीचा व्हेलची उलटी सदृश पदार्थ (अंबरग्रीस) मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमालासह संशयित नीलेश याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
व्हेलच्या उलटीची तस्करी: मुख्य सूत्रधाराला सिंधुदुर्गमधून अटक, आतापर्यंत २४ कोटींचा मुद्देमाल जप्त
By शीतल पाटील | Published: February 13, 2023 7:33 PM