सांगली : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली. या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी ७५ लाख ५० हजार रुपये आहे. शहरातील शामरावनगर परिसरात सापळा लावून ही कारवाई करण्यात आली.सलीम गुलाब पटेल (वय ४९, रा. खणभाग, सांगली) व अकबर याकूब शेख (५१, रा. पिंगुळी, मुस्लिमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलो एक कोटी रुपये दराने व्हेल माशाची उलटी विकली जाते. मात्र, तिच्या विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे तिची तस्करी सुरू असते. शहरातील शामरावनगर परिसरात संशयित व्हेल माशाची उलटी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता, मोटारीतून संशयित पिवळसर रंगाचा बॉक्स घेऊन खाली उतरला. एवढ्यात पथकाने त्याला पकडले. यानंतर वनविभागाच्या पथकाने तपासणी केली. संशयितांकडील बॉक्समध्ये घट्ट उलटीचे आठ नग मिळून आले.याबाबत सलीम पटेल याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील साथीदाराच्या मदतीने ही उलटी विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले.संशयितांकडून उलटीसह मोटार, दुचाकी असा माल जप्त करण्यात आला आहे. यावेळी वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे आदी उपस्थित होते. एलसीबीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, वनविभागाचे युवराज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सांगलीत पावणेसहा कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त, सांगलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संशयित अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 1:14 PM