सांगली : शहरातील विजयनगर येथील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर हा सारा परिसर कटेमेंट झोन जाहीर करण्यात आला. या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला असून दुसऱ्या अहवालाची प्रतिक्षा आहे. मृत व्यक्तीला कोरोना कशामुळे झाला, याचा अद्याप शोध सुरू आहे. त्यामुळे विजयनगरचा परिसर ३ मेपर्यंत लॉकच राहणार आहे. विजयनगर येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.
हा व्यक्ती गणपती पेठेतील एका सहकारी बँकेत नोकरीस होता. या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जिल्हा प्रशासनाने विजयनगरचा पाच किलोमीटरचा परिसर सील करून कटेंनमेट झोन जाहीर केला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील ४३ जणांना संस्था विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यात मृत व्यक्तीचे आई, वडील, पत्नी मुलगा भाऊ यांच्यासह बँकेतील अकरा सहकाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांच्या स्वाबचे नमुने निगेटिव्ह आले होते. मृत व्यक्तीला कोरोना कशामुळे झाला, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. पण अद्याप त्याला यश आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, विलगीकरण कक्षातील लोकांची दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. मृत व्यक्तीचा संपर्क अद्याप शोधला गेला नसल्याने प्रशासनाने विजयनगरच्या परिसर आवश्यक उपाययोजना सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे ३ मेपर्यंत हा परिसर लॉकच राहणार आहे.