तासगाव : तासगाव तालुक्यात यावेळी झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात राजकीय घुसळण झाली आहे. आयाराम, गयारामांमुळे तालुका विशेष चर्चेत आला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अस्तित्व, तर जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीचा एकूण रागरंग पाहिल्यानंतर या निवडणुकीत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची निष्ठा राष्ट्रवादीच्या सत्तेला अभेद्य ठेवणार की सत्तेचा वारु सुसाट असणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांनी निवडणुकीत वापरलेला करिष्मा काम करुन खासदार गटाला सत्तेची संधी देणार, याची उत्सुकता असून नेमका कौल कोणाला मिळणार, याचा फैसला उद्या दुपारपर्यंत होणार आहे.तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. तालुक्यातील एक लाख ५७ हजार ८६७ मतदारांनी अठरा जागांसाठीचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले. नेहमीप्रमाणचे या निवडणुकीत आबा आणि काका हे पारंपरिक गट एकमेकांशी भिडले. मात्र या निवडणुकी पहिल्यांदाच ग्रामीण भागातील राष्ट्रवादीची मजबूत पकड ढिली करण्यात खासदार संजयकाका पाटील यांनी यश मिळवले होते. आर. आर. पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून एकनिष्ठ असलेल्या अनेक शिलेदारांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीची सूत्रे आबांशी असलेली कार्यकर्त्यांची निष्ठा या एकाच मुद्याभोवती फिरत होती.दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील यांनीही या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीतील नाराजांना भाजपमध्ये घेत, सत्तेसाठी कोणाचेही वावडे नसल्याचे दाखवून दिले. केंद्र आणि राज्यातील सत्तेचा परिणामकारक वापर करुन राष्ट्रवादीत धक्कातंत्र वापरले. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात काट्याच्या लढतीचे चित्र निर्माण झाले. तालुक्यातील प्रचाराचा एकंदरीत रागरंग पाहिल्यांनतर या निवडणुकीत आबांची निष्ठा राष्ट्रवादीला तारणार की खासदारांनी केलेला वर्चस्वाचा करिष्मा भाजपला सत्तेचे सिंहासन मिळवून देणार? याची उत्सुकता आहे. (वार्ताहर)
आबांची निष्ठा की काकांचा करिष्मा?
By admin | Published: February 22, 2017 11:24 PM