नेवरी : आम्ही सुरूवातीपासूनच राजकारण बाजूला ठेवून कामे केली आहेत. नेवरीचा आतापर्यंत २५ टक्के भाग पाण्याखाली आला असून, ७० टक्के शेतीचा भाग ओलिताखाली आलेला नाही. गेली १४ वर्षे टेंभू योजनेची परवड सुरू आहे. सत्ताधारी टेंभू योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी काय कामे केलीत हे सांगावे, असा सवाल माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला.नेवरी (ता. कडेगाव) येथे पृथ्वीसंग्राम फाऊंडेशनच्या प्रारंभप्रसंगी देशमुख बोलत होते. यावेळी क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लाड, माजी जि. प. उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी, ‘महानंद’चे संचालक संदेश दंडवते उपस्थित होते.देशमुख म्हणाले, तालुक्यात टेंभूच्या पाण्यावर सहा ते सात लाख टन ऊस तयार झाला पाहिजे. तरुणांनी पुढे येऊन ही सर्व कामे स्वत: हातात घेतली पाहिजेत. विशेषत: गणपती मंडळाने बाकीचे कार्यक्रम न घेता उद्योगावर चर्चासत्रे घेतली पाहिजेत. टेंभू योजनेचे काम माझ्या काळात झाले असून, त्यासाठी संपतरावअण्णा देशमुख यांनी मंत्रीपद नाकारून टेंभूला मंजुरी घेतली होती, अरुण लाड म्हणाले, आम्ही केलेली कामे मागच्या निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचलीच नव्हती. कालच्या अंदाजपत्रकात शिक्षणासाठी तुटपुंजी तरतूद सत्ताधाऱ्यांनी जाहीर केली आहे.यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. जगदीश महाडिक यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास शिवाजी महाडिक, आबासाहेब साळुंखे, वसंत महाडिक, संतोष महाडिक, वीरेंद्र कुलकर्णी, संग्राम मोरे, शेखर मोरे, उध्दव महाडिक, लक्ष्मणराव माने उपस्थित होते. नितीन महाडिक यांनी आभार मानले. (वार्ताहर)
टेंभूबाबत सत्ताधाऱ्यांनी चौदा वर्षांत काय केले?
By admin | Published: July 16, 2014 11:36 PM