दादा घराण्याच्या बंडखोरीने काय साधले?, काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीने सांगली होतोय भाजपचा बालेकिल्ला

By हणमंत पाटील | Published: November 25, 2024 01:58 PM2024-11-25T13:58:58+5:302024-11-25T14:00:05+5:30

सांगली पॅटर्न विधानसभेत का फसला?

What did the Vasantdada Patil family achieve with Jayashree Patil's rebellion in Sangli Assembly Constituency BJP is benefiting from factionalism of Congress leaders | दादा घराण्याच्या बंडखोरीने काय साधले?, काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीने सांगली होतोय भाजपचा बालेकिल्ला

दादा घराण्याच्या बंडखोरीने काय साधले?, काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीने सांगली होतोय भाजपचा बालेकिल्ला

हणमंत पाटील

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने लोकसभेनंतर विधानसभेलाही बंडखोरी केली. लोकसभेची बंडखोरी ही काँग्रेसला न्याय मिळवून देण्यासाठी असल्याने यशस्वी झाली. पण, सांगली विधानसभेसाठी केलेली बंडखोरी थेट काँग्रेसच्या विरोधात असल्याने अयशस्वी ठरली. काँग्रेस नेत्यांना ही बंडखोरी रोखता आली नाही. त्यामुळे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांची हॅट्ट्रिक सोपी झाल्याने सांगली आता भाजपचा बालेकिल्ला होऊ लागला आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे सांगलीचा दबदबा राज्यभर होता. दादांच्या निधनानंतर काँग्रेसचा दबदबा डॉ. पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या काळापर्यंत कायम राहिला. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बालेकिल्ल्याला उतरती कळा लागली.

दादा घराण्याभोवतीच फिरत राहिले नेतृत्व

सांगलीचे नेतृत्व हे वसंतदादा घराण्याभोवतीच फिरत राहिले. दादा यांच्यानंतर पुत्र प्रकाशबापू यांना पाचवेळा लोकसभेसाठी संधी मिळाली. पुतण्या विष्णूअण्णा यांना आमदारकी मिळाली. नातू प्रतीक यांना केंद्रात व मदन पाटील यांना राज्यात मंत्रिपदाची संधी मिळाली. पण या काळातही काँग्रेस वाढली नाही. दादा घराण्याभोवतीच नेतृत्व फिरत राहिले. विशाल पाटील यांना खूप उशिरा संधी मिळाली. त्यावेळीही काँग्रेसने संधी डावलल्याने त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सुप्तावस्थेतील काँग्रेसला ऊर्जितावस्था आली. काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकजुटीने विशाल पाटील यांची बंडखोरी यशस्वी ठरली. सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे हा सांगली पॅटर्न राज्यभर गाजला.

सांगली पॅटर्न विधानसभेत का फसला?

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही उमेदवारी उद्धवसेनेला देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसवरील अन्याय दूर करण्यासाठी विशाल यांच्या बंडखोरीमागे सर्व नेते व कार्यकर्ते एकवटले. सांगली विधानसभा मतदारसंघातून त्यांना १९ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे जयश्री पाटील यांनाही विधानसभेला काँग्रेसमधील एका गटाने बंडखोरी करण्यास भाग पाडले. परंतु ही बंडखोरी थेट काँग्रेस विरोधातील होती. त्यामुळे सांगलीकरांना बंडखोरी न रुचल्याने त्यांची अनामत जप्त झाली. शिवाय पाच वर्षे मतदारसंघात मोर्चेबांधणी करणारे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचाही काँग्रेसमधील फुटीमुळे पराभव झाला.

सांगलीच्या इतिहासात गाडगीळ यांची हॅट्ट्रिक... 

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला, परंतु काँग्रेसअंतर्गत गटबाजीमुळे कधीही काँग्रेसच्या एका उमेदवाराला सलग तीन विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. काँग्रेसच्या दुफळीमुळे येथे भाजपचे संभाजी पवार हे तीन वेळा निवडून आले, परंतु त्यांनाही सलग तीन निवडणूक जिंकून हॅट् ट्रिक करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, काँग्रेसअंतर्गत गटबाजी व नेत्यांच्या चुकामुळे भाजपचे संयमी आमदार सुधीर गाडगीळ यांची हॅट् ट्रिक झाली.

लोकसभेला एकवटलेली काँग्रेस का फुटली...

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या एकजुटीचे नेतृत्व डॉ.विश्वजीत कदम यांनी केले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊ नये, यासाठी विश्वजीत कदम यांनी प्रयत्न केले. पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात समझोता घडवून आणण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिकृत उमेदवाराच्या पाठिशी राहण्याच्या जाहीर आवाहन केले, पण काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील हे बंडखोर जयश्री पाटील यांच्यामागे उभे राहिले. त्यामुळे लोकसभेला एकवटलेली काँग्रेस पुन्हा दुभंगली. त्याचा फटका म्हणजे, सांगली विधानसभेची जागा पुन्हा एकदा काँग्रेसने गमावली.

२०२४ लोकसभा व विधानसभेतील मताधिक्य
निवडणूक- उमेदवार - मताधिक्य

लोकसभा - विशाल पाटील - १९ हजार
विधानसभा - सुधीर गाडगीळ - ३६ हजार

Web Title: What did the Vasantdada Patil family achieve with Jayashree Patil's rebellion in Sangli Assembly Constituency BJP is benefiting from factionalism of Congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.