लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अत्यावश्यक सुविधा म्हणून सध्या बँकांचे कामकाज सुरू असले, तरी बँकांबाहेर वाढणाऱ्या रांगांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पेन्शनसह अन्य महत्त्वाची कामे करण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीत किरकोळ कामे करणाऱ्यांचीही भर पडत आहे. अशा लोकांची डोकेदुखी बँक प्रशासनासमोर अधिक आहे.
जिल्ह्यातील बँकिंग सेवा सुरळीत असली, तरी गर्दी नियंत्रणात आणण्यात बँकांना अपयश येत आहे. बँकांबाहेर लांब रांगा लागत आहेत. पेन्शनसाठी वयोवृद्ध नागरिकांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना, बँक ग्राहकांची ही कसरत सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे. विशेषत: सांगली व मिरज शहरातील राष्ट्रीयकृत बँकांबाहेर रांगा अधिक आहेत. किरकोळ कामांसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी बँकांकडे कोणतेही नियोजन नाही. याचे नियोजन झाले, तर निश्चितपणे अत्यावश्यक कामांना प्राधान्य मिळून गर्दी नियंत्रणात येऊ शकते.
भर उन्हात अनेक तास थांबावे लागते
कोट
सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मी बँकेच्या दारात रांगेत उभी आहे. आता अकरा वाजत आले, तरी अजून नंबर आला नाही. बँकेत गेल्यानंतरही लगेच काम होईल की नाही, सांगता येत नाही.
- शांता ढोले, बँक ग्राहक
कोट
बँक उघडण्यापूर्वीपासून रांगेत आहे. उन्हात ग्राहकांना थांबावे लागते. ग्राहकांसाठी कोणतीही सुविधा बँकांबाहेर दिसत नाही. कोरोनाचे नियम पाळत असताना अकारण या गोष्टींचा त्रास सामान्य ग्राहकांसह ज्येष्ठ नागरिकांना होत आहे.
-गिरीश शिंगणापूरकर, बँक ग्राहक
कोट
बँकेत जाताना रांगेतूनच जावे लागते. दोन किंवा तीन ग्राहकांनाच एका वेळी बँकेत सोडले जाते. त्यामुळे रांगेत थांबण्याचा त्रास होतो.
- संभाजी जाधव, बँक ग्राहक
कोट
सर्व बँकांना आम्ही गर्दी नियंत्रणात आणण्याची सूचना केली आहे. कोरोना नियमांचे पालन करतानाच किरकोळ कामांसाठी नागरिकांनी बँकांमध्ये अकारण गर्दी करू नये. बँकांच्या ऑनलाइन सुविधांचा वापर ग्राहकांनी करावा.
- डी.व्ही. जाधव, प्रबंधक, अग्रणी बँक, सांगली
कोट
ग्रामीण भागात आमच्या बँकांमध्ये गर्दी होत असते. अशा वेळी शाखांच्या खिडकीतून व्यवहार केले जात आहेत, तरीही बँक ग्राहकांनी स्वयंशिस्त पाळून बँकांना सहकार्य करावे. हा सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न आहे.
- जयवंत कडू-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक