सांगली - मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाची चर्चा आज संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. राज यांच्या भाषणावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरेंनी भाषणात माहीम आणि सांगली अशा दोन ठिकाणच्या जागेचा मुद्दा प्रखरतेने भाषणात मांडला. यावेळी राज यांनी सांगलीतील कुपवाड परिसरातील नागरिकांनी पाठवलेलं पत्र वाचून दाखवले. त्याचसोबत सांगलीतील वादग्रस्त जागेचे फोटो दाखवले.
राज ठाकरे यांनी भाषणात दाखवलेल्या मुद्द्यांवरून आता प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. माहीम येथील अनधिकृत बांधकाम पाडले तसे सांगलीतील वादग्रस्त जागेची मोजणी सुरू झाली आहे. याठिकाणी अधिकाऱ्यांनी वादग्रस्त जागेची पाहणी केली. यावेळी हिंदू संघटनेचे अनेक कार्यकर्ते जमा झाले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी याठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात केला त्याचसह दंगल विरोधी पथकही सज्ज करण्यात आले आहे.
याठिकाणी उपस्थित असलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते शंभुराज काटकर म्हणाले की, २००८ सालापासून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. शिवसैनिक काम करतायेत. ज्यांनी काल भाषण केले तेदेखील तेव्हा शिवसेनेत होते. इथल्या स्थानिक नागरिकांची भूमिका काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्यांचे काम केले नाही. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर राज ठाकरेंना हा विषय मांडता आला नसता. अल्पकिंमतीत मिळणाऱ्या जागा घ्यायच्या आणि असे उद्योग इथे केले जातात. याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होते. केलेल्या तक्रारीचे निरसन झाले तर अशा घटना घडत नाहीत असं सांगत एकप्रकारे राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे.
तर राज ठाकरेंनी मुंबईतील मेळाव्यात हा उल्लेख केला. या भागात बहुसंख्य हिंदू असताना आणि काही मोजकीच घरे मुस्लीम समाजाची आहेत. त्यांच्यासाठी १२ मशिदी असताना हिंदूंचा विरोध डावलून गुंडगिरी, दडपशाही करून याठिकाणी बेकायदेशीर मशिदीचे काम सुरू आहे असा आरोप भाजपा नेते नितीन शिंदे यांनी केला.