सांगली : राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या उपकार व मदतीवर राजकीय वाटचाल करणाऱ्या पृथ्वीराज पवार यांची त्यांचा राजीनामा मागण्याची पात्रता नाही, असे प्रत्युत्तर महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिले. पवार यांनी लॉटरी घोटाळ्यासह इतर गैरकारभारप्रकरणी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी मंगळवारी केली होती. त्याबाबत सूर्यवंशी व पवार म्हणाले की, पृथ्वीराज पवार वाहत्या गंगेत हात धुऊन घेत आहेत. मोठ्या नेत्यावर आरोप करून खोटी प्रसिद्धी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सनदी अधिकारी आनंद कुलकर्णींच्या कारभाराचा जयंत पाटील यांनी भांडाफोड केल्यानेच आता ते पाटील यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. जयंतरावांची स्वच्छ प्रतिमा मलीन करण्याचा उद्योग सुरू आहे. आणखी एक घोटाळा उघड करण्यासाठी आठ दिवसांची गरजच काय? आताच त्यांनी तो उघड करावा. पृथ्वीराज पवार यांचे आरोप हास्यास्पद आहेत. जयंतरावांवर टीका करण्याची त्यांची पात्रता नाही. एचसीएल घोटाळ्याबाबत पवार यांनी आरोप केले. ते नगरसेवक असतानाच एचसीएलचा ठेका दिला होता. तेव्हा त्यांना घोटाळा दिसला नाही का? पवारांना साधी पतसंस्था, दूध डेअरीही चालविता आलेली नाही. गेली २० वर्षे जयंत पाटील यांनी त्यांच्यावर केलेल्या उपकार व मदतीची माहिती जनतेला आहे. आमदारकीच्या कालावधित पवारांनी काय दिवे लावले, याचीही कल्पना आहे. जयंत पाटील यांचा राजीनामा मागण्याइतके ते मोठे नाहीत. त्यांनी स्वत: निवडून यावे. काही मंडळींना जयंत पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. आमच्या नेत्यावर टीका केल्यानंतर त्यांना कोणीतरी मदत करेल, अशी अपेक्षा असते. त्यांचे राजकीय अस्तित्व संपलेले आहे. जयंतरावांची प्रतिमा मिस्टर क्लिन अशीच आहे. विरोधकांकडून साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार सुरू आहे. राज्यात युतीची सत्ता आहे. त्यांनी जयंतरावांवरील आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
पृथ्वीराज पवारांची पात्रता काय?
By admin | Published: June 21, 2016 11:10 PM