सांगली : आमच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा स्वाभाविक मैत्रीचा आव राष्ट्रवादी आणत आहे. त्यांची मैत्री स्वाभाविक नव्हे, तर स्वार्थी आहे. त्यांचा हा खेळ त्यांच्याच अंगाशी येणार आहे, असे मत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असेल तर ती केव्हातरी समोर येणारच आहे. अशा गोष्टी लपत नाहीत. ती त्यांची जुनी सवय आहे. नांदायचे एकाशी आणि मैत्री दुसऱ्याशी, असा प्रकार ते करीत असतात. त्यामुळेच जनसामान्यांत बदनाम होण्यात राज्यात राष्ट्रवादी पुढे आहे. हा वादावादीचा पक्ष असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ४० पेक्षा अधिक जागा मिळूच शकणार नाहीत. वादग्रस्त फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याबद्दल आता अजित पवार बोलत आहेत. प्रत्यक्ष निर्णय होत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तोंड का बंद केले होते? इतके दिवस गळ्यात गळे घालून ते काम करीत होते. आघाडी तुटल्याबरोबर अचानक त्यांना आमचा कारभार चुकीचा वाटू लागला आहे. त्यांचे हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत आमची मुख्य लढत भाजपशी असेल. राष्ट्रवादीला ४० च्या पुढे जागा मिळणार नाहीत आणि शिवसेना साडेपंचवीस जागांची धनी असेल. राज्यातील वातावरण पाहता काँग्रेसलाच स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे खरे रूप आता लोकांसमोर आले आहे. त्यांच्या केंद्रातील कारभाराबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी जी आश्वासने निवडणूक काळात दिली, त्याच्या दिशेने त्यांची कोणतीही वाटचाल झालेली नाही. त्याउलट कारभार सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्षाने गेल्या पाच वर्षांत त्यांची भूमिका योग्यरीत्या बजावली नाही. शिवसेनाही त्यात सहभागी असल्याने जनता आता काँग्रेसच्याच मागे आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खंजीर खुपसणारा मित्र कसला ?
By admin | Published: October 04, 2014 11:59 PM