विटा : महाराष्ट्राचा विकास भाजपशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे केंद्रात भाजपकडे जशी एकहाती सत्ता दिली तशी महाराष्ट्रातही द्या, असे आवाहन करतानाच जे शेती व पिण्यास पाणी देऊ शकत नाहीत, ते सरकार काय कामाचे? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी विटा येथील कार्यक्रमात उपस्थित केला.विटा येथे आज गुरुवारी भाजपची प्रचारसभा पार पडली. राजनाथसिंह म्हणाले, महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे गेली १५ वर्षे सरकार होते. परंतु, या सरकारने काय केले? आदर्श, सिंचन घोटाळ्यासह शेतकरी आत्महत्या आणि राज्यात सुमारे १ हजार ३६२ बलात्काराच्या घटना झाल्या तरी, महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असल्याचे सांगितले जाते. भाजपचे देशातील पाच राज्यात सरकार आहे. त्यांचीही कामे बघा. देशात भाजपचे बहुमताने सरकार स्थापन झाले. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधित पेट्रोल व डिझेलच्या किमती तीनवेळा कमी झाल्या. आणखीही पेट्रालचे दर कमी होणार आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते केवळ सत्तेसाठी व स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, आपण केंद्रात भाजपचे बहुमताने सरकार आणून कुर्ता चढविला, तसा महाराष्ट्रातही भाजपचे बहुमताने सरकार आणून पायजमा चढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अनिल म. बाबर यांनी केले. यावेळी गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, तालुकाध्यक्ष अॅड. गणेश देसाई, रूपाली मेटकरी, दिलीप आमणे, अॅड. विनोद गोसावी, तानाजी यमगर, कुमार लोटके, शुभांगी सुर्वे, विठ्ठलराव मोरे, बंडोपंत देशमुख, बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. आभार कुमार लोटके यांनी मानले. (वार्ताहर)पाकिस्तानला इशारा...जत : पाकिस्तानकडून सीमारेषेचे वारंवार उल्लंघन होत आहे. परंतु, त्याला आपले जवान जशास तसे उत्तर देत आहेत. भारताची इंच न् इंच जमीन आपली आहे. त्यावर कोणी नजर ठेवत असले तर, त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. सैनिकच उत्तर देत असल्यामुळे आम्हाला परत यासंदर्भात उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे राजनाथसिंह यांनी जत येथील सभेत सांगितले. पाकिस्तानकडून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताची सुरक्षाव्यवस्था सक्षम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजयकाकांची गैरहजेरीया सभेस भाजपचे खा. संजयकाका पाटील आले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती सभास्थळी चर्चेचा विषय बनली होती.देशात सत्ता येऊन फक्त चार महिने झाले आहेत. या चार महिन्यांत वाढती महागाई कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर दर सतत कमी केले आहेत. खत सबसिडी अनुदान यापुढे थेट शेतकऱ्यांना देणार आहे; उद्योगपतींना देणार नाही, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जत येथे भाषणाची सुरुवात मराठीतून करताना, मी शुद्ध मराठी बोलू शकत नसलो, तरी समजू शकतो, असे सांगितले.
पाणी न देणारे सरकार काय कामाचे?
By admin | Published: October 09, 2014 11:39 PM