नितीन नलवडेसांगली : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, अनेकजण वर्षापर्यटनासाठी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात; परंतु अतिउत्साहामुळे काही वेळा आपला जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. पुण्याजवळील लोणावळा येथील घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्या एका घटनेत राधानगरीत पर्यटनासाठी गेलेले निपाणीतील दाेन युवक दुधगंगा नदीत बुडाले.सध्या रिल्सचा जमाना असून, या रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजचे तरुण-तरुणी कोणत्याही थराला जात आहेत. रिल्सच्या नादाला लागून अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. सध्या पावसाला नुकताच सुरू झाला आहे. निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. पर्यटनासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत. उंचच उंच डोंगरावरून खाली पडणारा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. यावेळी धबधब्याच्या ठिकाणी जाताना प्रवाहात वाहून जाण्याची मोठी शक्यता असते. यावेळी कुटुंबासोबत जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच सुटीच्या दिवशी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक जण आंबोली, कॅसलरारॅक, ठाेसेघर, गोकाक, राऊतवाडी, वजराई, नवजा आंबा घाटात आवर्जून जात असतात; परंतु अशा ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात, तसेच धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने घसरून पडण्याची शकयता असते, तसेच सेल्फीसाठी अनेक जण जीव धोक्यात घालतात, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, अशातच अजाणतेपणे लाखमोलाचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी निसर्गाचा आनंद लुटताना भान ठेवणे गरजेचे आहे.
रिल्स, सेल्फीसाठी वाटेल तेसध्या तरुणाईमध्ये रिल्सची जणू स्पर्धाच लागली आहे. यामध्ये अनेक तरुण, तरुणी आपला जीव धोक्यात घालून डोंगराच्या, तसेच दरीच्या टोकावर उभे राहून सेल्फी घेत असतात. यामध्ये ते आपल्या जिवाची पर्वा करत नाहीत, आणि लाखमोलाचा जीवच गमावून बसतात. वेगवेळे चॅलेंज स्वीकारण्याच्या नादात धबधब्याच्या मोठ्या प्रवाहात जाऊन अतिधाडस करतात; परंतु हेच धाडस जिवावर बेतू शकते.