स्टार ७९२
फोटो ०८ भाग्यश्री इंदोलीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाने तरणीताठी माणसे जगाचा निरोप घेत असताना वृद्धांनी मात्र त्याच्यावर दणदणीत मात केली आहे. तीव्र इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोरोनाला परतावून लावले आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाने ज्येष्ठांना कचाट्यात पकडले. विशेषत: रक्तदाब आणि मधुमेहासह विविध व्याधी असलेले वृद्ध पिकल्या पानाप्रमाणे कोरोनाला बळी पडले. मात्र, अशा गंभीर स्थितीतही अनेक वृद्धांनी हिमतीने कोरोनाशी लढा दिला. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार काटेकोर औषधे घेतली. आरोग्यदायी दैनंदिनी अंगिकारली. महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास ढळू दिला नाही. विविध व्याधी असल्याने वेळीच चाचणी करून घेतल्यानेही अनेकांचा बचाव झाला. आयुष्यात एकदाही सुई घेतली नाही किंवा अैाषधाची गोळी खाल्ली नाही, हा त्यांचा आत्मविश्वास कोरोनामध्ये उपयुक्त ठरला.
या वयोवृद्धांनी आयुष्यभर आरोग्यदायी जीवनशैली जगल्याचाही त्यांना फायदा झाला. सकस आहार, कठोर शारीरिक परिश्रम, स्वभावातील चिकाटी यामुळे वृद्धांनी उपचारांदरम्यान साथ दिली. जिल्हाभरात शंभरी पार केलेल्या अनेक वृद्धांनी कोरोनावर मात केल्याची उदाहरणे आहेत. या वयात अनेक व्याधी असतानाही त्यांनी उपचारांचा हात सुटू दिला नाही. कुटुंबीयांनीही पाठबळ कायम ठेवल्याने कोरोनाविरोधातील लढा जिंकता आल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाने शिकार केले. त्यावेळीही कोविड रुग्णालयांत वृद्ध कोरोनाबाधित तरुणांच्या बरोबरीने कोरोनाशी लढत राहिले. ऑक्सिजन पातळी ८०पेक्षा खाली घसरलेल्या वृद्धांनीही श्वास थांबू दिला नाही, किंबहुना मिरज कोविड रुग्णालयांतून बरे होऊन बाहेर पडलेल्या पहिल्या ५० रुग्णांमध्ये १०५ वर्षे वयाच्या वृद्धाचा समावेश होता. त्यांचा कोरोनाविरोधातील लढा अन्य रुग्णांसाठीही प्रेरणादायी ठरला.
९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह ४१५
बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३२४
अशी आहे आकडेवारी
पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह १७५
दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह २४०
पहिल्या लाटेतील बळी ३३
दुसऱ्या लाटेतील बळी ५८
चौकट
६१ ते ७० वयोगटात सर्वाधिक मृत्यू
१. ६१ ते ७० वयोगटात सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आढळले आहे. या वयोगटात पहिल्या लाटेत ५२९ जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेत ३५० हून अधिक रुग्ण मरण पावले.
२. ७१ ते ८० वयोगटातील मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. पहिल्या लाटेत ४३८, जण तर दुसऱ्या लाटेत २३० रुग्ण बळी पडले.
३. त्याखालोखाल ५१ ते ६० वर्षे वयोगटात मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेत ३५५ जणांचे, तर दुसऱ्या लाटेत २५०हून अधिक कोरोनाबाधितांना प्राण गमवावे लागले.
४. ८१ ते ९० वर्षे वयोगटात पहिल्या लाटेत १५२ जणांचे प्राण गेले, दुसऱ्या लाटेत तुलनेने कमी म्हणजे ४५ जणांचे मृत्यू झाले.
कोट
आमच्या जिद्दीपुढे कोरोनाची काय बिशाद!
थोडासा संशय येताच मी तातडीने तपासणी करून घेतली. लक्षणे नसली तरी अहवाल पॉझिटिव्ह आला. शासकीय कोविड रुग्णालयात त्वरित दाखल झाले. जिद्द कायम राखली. मधुमेह आणि रक्तदाब असतानाही आत्मविश्वास हरवू दिला नाही. त्यामुळे कोरोनातून सहीसलामत बाहेर पडले. डॉक्टरांनीही माझ्या जिद्दीचे कौतुक केले. वृद्ध रुग्णांनी न घाबरता औषधे घेतल्यास कोरोनाला हरवू शकतो, हे दाखवून दिले.
- भाग्यश्री इंदोलीकर, मिरज