- श्रीनिवास नागेएकीकडं वैशाख वणव्यानं अख्खा जिल्हा भाजून निघतोय, तर दुसरीकडं राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस-राष्टÑवादीतला राजकीय संघर्षाचा विस्तव फुलवण्यास सुरुवात केलीय. विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला सहजासहजी ‘बाय’ मिळणार नाही, याचे संकेत देत रविवारी त्यांनी पुण्यातल्या राष्टÑवादीच्या बैठकीत दबावाची चाल खेळली. काँग्रेसची भूमिका समन्वयाची नसेल तर, पलूस-कडेगावात अरुण लाड यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्यांना किती दोष देता येईल, असा खडा त्यांनी टाकला. अर्थात तिथं राष्टÑवादी पक्ष म्हणजे पूर्वीचा देशमुख-लाड गट आणि आताचा केवळ लाड गट काँग्रेससोबत होताच कधी, या प्रश्नाच्या उत्तरात पवारांच्या दबावाला मिळणारा प्रतिसाद दडला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानं रिक्त झालेल्या विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालीय. ती जाहीर झाली, त्याच्या दुसºया दिवशी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी इथून राष्टÑवादीचा उमेदवार देणार नसल्याचं सांगितलं. शिवाय काँग्रेसला अप्रत्यक्ष पाठिंबाही दिला. पण त्याच्या दुसºयाच दिवशी शरद पवारांनी पुण्यात राष्टÑवादीचे इरादे स्पष्ट केले. पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसची सूत्रं पतंगराव कदम घराण्याच्या हाती एकवटली आहेत, तर पृथ्वीराज देशमुख आणि अरुण लाड गट त्यांचे कट्टर विरोधक. देशमुख गट भाजपमध्ये गेला असल्यानं आता तिथली राष्टÑवादी म्हणजे ‘सबकुछ अरुण लाड गट’! राज्यभरात भाजप आणि राष्टÑवादी एकमेकांवर कितीही तोंडसुख घेत असले तरी पलूस-कडेगावात मात्र त्यांचं सोयीस्कर ‘अंडरस्टँडिंग’! देशमुख-लाड गट अनेक वर्षांपासून हातात हात घालून काम करत होते. (आताही करताहेत!) पलूस तालुक्यातल्या काही गावांत लाड गटानं, तर उर्वरित गावांसह कडेगावमध्ये देशमुखांनी कदमांच्या विरोधात रान पेटवायचं, ही समजून-उमजून केलेली ‘सेटिंग’. परिणामी त्यांचा आणि कदम गटाचा उभा दावा.
पृथ्वीराज देशमुख आणि अरुण लाड या दोघांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा प्रबळ. सहकारी आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून दोघांनीही स्वतंत्र नेटवर्क उभं केलेलं. त्यामुळं कदमांना तगडी टक्कर देण्याची नेहमीच तयारी. विधानसभेची तिथली एक निवडणूक वगळता प्रत्येकवेळी पतंगराव कदम यांना पृथ्वीराज देशमुखांनी आव्हान दिलेलं. त्यामागं लाड यांचीही ताकद होती. देशमुखांनी कमळ हातात घेतलं, पण लाडांनी मात्र घड्याळ सोडलं नाही. दरम्यान, २०१४ मध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत लाडांनी राष्ट्रवादीविरोधात बंड केलं. त्यावेळी देशमुखांनी त्यांच्यामागं सगळी ताकद लावली होती, पण बंड फसलं. त्यातून लाड राष्टÑवादीवर रूसले. अर्थात नंतर हा रुसवा काढला गेला.
या पार्श्वभूमीवर आताची पोटनिवडणूक आणि उद्याची सार्वत्रिक निवडणूक समोर ठेवून शरद पवार यांनी रविवारी राष्टÑवादीच्या बैठकीत फटाके फोडले. ‘मित्रपक्षानं आमची ताकद पाहून सन्मानपूर्वक वाटाघाटी कराव्यात. सातारा-सांगली विधानपरिषदेची जागा राष्टÑवादीकडं असताना मित्रपक्षानं सत्ता, संपत्ती आणि साधनांचा वापर करून आमच्याकडून ही जागा हिसकावून घेतली. आता आम्ही काय करायचं? काँग्रेसची भूमिका समन्वयाची नसेल तर पलूस-कडेगावमध्ये अरुण लाड यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्यांना किती दोष देता येईल?’ हे सांगताना राष्टÑवादीची ताकद आणि उपद्रवमूल्य त्यांनी अधोरेखित केलं. ...आणि आम्हाला गृहीत न धरता काँग्रेसनं स्वत:चं स्वत: बघावं, हा मेसेजही यानिमित्तानं त्यांनी दिला.
जाता-जाता : सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर तब्बल दीड वर्षांनी शरद पवार बोलले. काँग्रेसच्या तेव्हाच्या खेळीवर इतक्या कालावधीनंतर ते आताच का बोलले? नेमकी पोटनिवडणूक तोंडावर असताना त्यांनी दिलेले सूचक इशारे काय सांगतात? ज्या कदम गटानं राष्टÑवादीला दणका दिला, त्याच कदम गटाला सहजासहजी ‘बाय’ मिळणार नाही, हे सांगण्यामागचा उद्देश काय?...काँग्रेसवर दबाव टाकण्याचा आणि जमलंच तर खिंडीत गाठण्याचा पवारांचा हेतू लपत मात्र नाही, हेच खरं!ते सोबत कधी होते?अरुण लाड यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्यांना किती दोष देता येईल, असा खडा सवाल शरद पवारांनी केला खरा, पण त्यातून दुसरा प्रश्न समोर येतो, की लाड तेथे काँग्रेससोबत होतेच कधी? पृथ्वीराज देशमुख राष्टÑवादीत असताना अरुण लाड यांची त्यांना साथसंगत होतीच, पण देशमुख भाजपवासी झाल्यानंतरही लाडांनी आतून देशमुखांना साथ दिली. विधानसभेच्या मागील निवडणुकीत पलूस-कडेगावातून राष्टÑवादीकडून स्वत: लाड उभे राहिले नाहीत आणि दखलपात्र उमेदवारीही दिली नाही! पतंगराव कदम यांच्याविरोधात भाजपच्या पृथ्वीराज देशमुख यांना मिळालेली मते पाहता लाडांनी ‘पदवीधर’वेळचा देशमुखांचा पैरा फेडला, हे सांगायला कुणा राजकीय संख्याशास्त्रज्ञाची गरज नाही! पुढे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत तर हे ‘अंडरस्टँडिंग’ आणखी गडद झालं...जयंतराव काय करणार?जिल्ह्याच्या राजकारणात अरुण लाड यांचा गट जयंत पाटील यांचं नेतृत्व मान्य करतो. आता जयंतराव राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष बनलेत. पतंगराव कदम यांना विधानसभेची एक निवडणूक सोपी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी पृथ्वीराज देशमुखांना थांबवले होते. भाजपशी विशेष दोस्ताना असणाºया जयंतरावांना अलीकडं भाजपनंच अडचणीत आणण्याचा चंग बांधला असताना ते पलूस-कडेगावातल्या राष्टÑवादी-भाजपच्या दोस्तान्यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.