दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला प्रतिसाद देत तासगावकर जनतेने भाजपला पालिकेची सत्ता बहाल केली. मात्र सत्तेत आल्यापासून सत्ताधारी कारभारी राजकीय कुरघोड्या करण्यात मश्गुल आहेत. शासनाकडून आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कोणत्याही नियोजनाअभावी खर्ची टाकण्यात धन्यता मानत आहेत. त्यातच शहरातील नागरी समस्यांमुळे तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांच्या विकासावर भरोसा हाय का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.तासगाव नगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. तेव्हापासून सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आली. खासदार संजयकाकांनी शासनदरबारी वजन वापरुन कोट्यवधींचा निधी मंजूर आणला आहे. मात्र नगरपालिकेकडून हा निधी खर्ची टाकताना, जनतेचे गरजेपेक्षा कारभाऱ्यांच्या सोयीलाच जास्त प्राधान्य दिले जात आहे. इतकेच नव्हे, तर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, झालेल्या कामाची गुणवत्ता हा संशोधनाचा विषय ठरला आहे. सल्लागार अभियंत्यांच्या भरवशावर बेभरवशाची कामे होत असल्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.पालिकेच्या नियोजनहीन कारभारामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. चोवीस तास पाणी योजनेचा ढोल पिटण्यात आला. त्यासाठी प्रत्येक नळकनेक्शनधारकाला मीटर जोडण्यात आली; मात्र जाडलेली मीटर निकृष्ट दर्जाची असल्याने ही मीटर कुचकामी ठरली. त्यामुळे चोवीस तास पाणी योजनेचा बोजवारा उडाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे काम अनेक महिन्यांंपासून रखडलेले आहे. पुतळा उभारणीवेळी दोन महिन्यांत नवीन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत पुतळा उभारणी झाली नसल्याने शिवप्रेमींत नाराजी आहे. तासगाव शहर सीसीटीव्हीमय करण्याबाबत अनेकदा घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत सीसीटीव्हीला मुहूर्त लागलेला नाही.पावसाळ्यात शहरातील मळी भागातील नागरिकांना सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागतो. शहरातील लांडघोलमळा, चपाटे मळा, वडमळा, खानापुरे मळा, मिरजकर मळा, म्हेत्रे मळा, खाडेवाडीसह अनेक मळीभागात रस्त्यांची दुरवस्था आहे. नागरिकांकडून मुरुमीकरणाची मागणी होऊनदेखील पालिकेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मळीभागात दलदलीचे साम्राज्य झाले आहे.अशा एक ना अनेक समस्यांचा सामना तासगावकरांना करावा लागत असताना, सत्ताधारी समस्या नामशेष करण्याऐवजी, पालिकेतील विरोधकांना नामशेष करण्याच्या पाठीमागे लागले आहेत. केवळ कुरघोड्यांचे राजकारण करुन राष्ट्रवादीला नामोहरम करण्यात सत्ताधारी कारभारी मश्गुल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विकासाच्या आश्वासनांना प्रतिसाद देत, सत्तेत बसवलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांवर भरवसा राहिलाय का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.बेकायदा बांंधकामावर हातोडा केव्हा? भाजपचे पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका निर्मला पाटील यांचे बेकायदा बांधकाम असल्याने नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या नव्हे, तर शहरातील अनेक बड्या लोकांंनी पालिकेच्या अनेक मोक्याच्या जागांवर बेकायदा अतिक्रमण केले आहे. अशा जागा सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का? असा सवालही उपस्थित होत आहे.
तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांवर भरोसा हाय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:25 PM