विधानसभेचा निकाल लागून पावणेतीन महिने झाले. कृष्णा-वारणेच्या पुलाखालून बरंच पाणी गेलंय. येताना निम्मं पाणी वाळव्यात मुरलंय, तर बाकीचं पलूस-कडेगावमार्गे पार आटपाडीपर्यंत आणि म्हैसाळमार्गे कवठ्याच्या पुढं जतपर्यंत गेलंय. इलेक्शनमुळं आबांनी हिकमतीनं येरळा आणि अग्रणीलाही पाणी आणलं होतं (ते अजून टिकून आहे, बरं का!). सरकार बदललं आणि सांगलीतले तिन्ही लाल दिवे गेले. त्यामुळं सोनसळच्या साहेबांचा मुक्काम हल्ली पुण्यातच असतो. आबा आजारपणातनं बाहेर पडले तरी विश्रांतीसाठी मुंबईतच आहेत. इस्लामपूरचे साहेब मात्र सगळीकडं फिरताहेत. जरा गराडा कमी झालाय, पण क्रेझ कायम! त्यांच्या इशाऱ्यावर कमळाच्या पाकळ्या अजूनही हलतात. संजयकाकांपासून जगताप साहेबांपर्यंत सगळे भाजपेयी त्यांच्या ‘कॉन्टॅक्ट’मध्ये असतात. साहेबांची रसद होती म्हणूनच लोकसभेला संजयकाका आणि नंतर विधानसभेला ‘कमळा’बाईचे चारपैकी तीन शिलेदार निवडून आले! इस्लामपूरच्या साहेबांचा भाजपेयींशी (पक्षी : आताचा मोदी तंबू) तसा जुना घरोबा (आतून हं!). यंदा विधानसभेचं वारं फिरताच साहेबांचे कान हलू लागल्याचं बारामतीच्या थोरल्या साहेबांनी बरोब्बर हेरलं आणि इस्लामपूरकरांच्या मोदी तंबूकडं जायच्या वाटा रोखल्या.निकालानंतर नरेंद्रांच्या इशाऱ्यावर देवेंदजी सांगलीला एकतरी लाल दिवा देतील, असं वाटतं होतं. नाईक साहेबांच्या आणि मिरजेच्या खाडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी पेरण्यात आली, पण इस्लामपूरचे साहेब आडवे आल्यानं नाईक साहेबांच्या नावावर फुली मारली गेली, तर कमळाबाईच्या अड्ड्यावर ऊठबस नसल्यानं खाडेंचं नाव यादीतनं गळलं. तेवढ्यात उसाच्या फडातून सदाभाऊंचं नाव पुढं आलं. (पण शेट्टींच्या राजूभार्इंनीच सदाभाऊंना लाल दिवा न देता नकाराची ‘लाल बत्ती’ दाखवली म्हणे! ‘मला नाही, तर तुलाही नाही...’ अशी हमरीतुमरी झाली म्हणे!) त्यातच ‘कमळा’बाईच्या अड्ड्यावर खाकी चड्डीतल्या मंडळींची वर्दळ वाढली आणि त्यांनी गाडगीळ सराफांनाही लाल दिव्याच्या शर्यतीत आणलं... मग काय, बट्ट्याबोळ झाला..! सांगलीकर अजून त्या लाल दिव्याकडं डोळं लावून बसलेत. दर शनिवार-रविवारी सांगलीकरांना लाल दिवे बघण्याची, सायरन ऐकण्याची सवय झालेली. आता चुकल्या-चुकल्यासारखं वाटतंय. काँग्रेस कमिटी, चौकातलं रेस्ट हाऊस आणि अण्णा भवन सुनंसुनं वाटतंय. काँग्रेस कमिटीशेजारच्या कार्यालयाचं कुलूप लोकसभेपासून अधूनमधून काढलं जातं. तिथं म्हणे कधी काळी (?) माजी केंद्रीय मंत्री बसत. ते असल्यावर दाखल्या-चिठ्ठ्यांसाठी माणसं यायची. हल्ली त्यांचा मुक्काम सांगलीपेक्षा पाचगणीत अधिक असतो म्हणे! (असं पृथ्वीराज पाटील परवा सोनसळच्या साहेबांच्या कानात सांगत होते.) घड्याळवाल्यांच्या कार्यालयाची तर पार रया गेलीय. आधीच कमळाबाईनं खुणावल्यानं दिनकरतात्या, घोरपडे सरकार, जगताप साहेब, पृथ्वीराजबाबा यांच्यासोबत तिसऱ्या फळीनंही संगत सोडलीय. त्यात सत्तेच्या दोऱ्या तुटल्यात. जिल्हा परिषद कशीबशी हातात राहिलीय. पक्षांतरबंदीनं सदस्य अडकून पडलेत म्हणून... नाहीतर ते कधीच भुर्रर्रर्रऽऽऽ झाले असते. कमळाबाईचा अड्डा मात्र गजबजू लागलाय. अर्थात त्याची जागा कधी राजवाडा चौकात, तर कधी टिळक चौकात, तर कधी विश्रामबाग चौकात असते. कमळाबाईचा अड्डा काकांमुळं ‘सुखरूप’ राहिलाय बरं का, अशी कुजबूज काकांच्या तालमीतून ऐकू येतेय. हल्ली काकांची भाषाही मधाळ झालीय. फुल्या-फुल्यांच्या शब्दांची (सांगायलाच हवेत का?) जागा ‘शिंच्याऽऽ’ वगैरे अनुनासिक उच्चारांनी घेतलीय म्हणे! जुन्यातले आणि नव्यातले तिघे-चौघे तात्या, नीताताई, पप्पूशेठ, कमळातला ‘मकरंद’ चाखण्यासाठी आसुसलेले मिरजकर, गरूडाचे पंख लावलेली जुनी मंडळी इनामदारांच्या वाड्यावर बसून महामंडळाची स्वप्ने बघण्यात दंग आहेत. त्यांची भरारी तेवढीच!ताजा कलम : सांगलीतल्या तमाम पक्ष कार्यालयांमध्ये हल्ली हमखास काही पोस्टर्स दिसताहेत. त्यावर लिहिलंय... ‘आपण यांना पाहिलंत का? ही व्यक्ती विधानसभा निवडणुकीपासून बेपत्ता आहे. ती कोणाला आढळल्यास मतदारांशी संपर्क साधावा.’ त्याखाली कडेपूरचे बाबा, खानापूर-आटपाडीतील टोपी आणि गोपी, अमरसिंहबापू, इस्लामपूरचे जितेंदर आणि चिकुर्ड्याचे अभिजितआबा, कवठ्याचे घोरपडे सरकार, सांगलीचे सांस्कृतिक अण्णा आणि मुन्नाभाई, मिरजेचे जाधव मास्तर आणि होनमोरे, शेंडग्यांचे प्रकाशअण्णा तथा माजी ‘आठवडा आमदार’ वगैरे मंडळींचे फोटो आहेत.- श्रीनिवास नागे
काय चाललंय सांगलीत?
By admin | Published: January 07, 2015 11:13 PM