कोकरुड : नव्याने करण्यात येत असलेल्या कोकरूड ते पाचवड फाटा राज्य मार्गावर रुंदीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा थकीत आणि नव्याने गेलेल्या शेतीची मोजणी करून शासनाने चालू दराने भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा येळापूर, शेडगेवाडी, खुजगांव, चिंचोली येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
कोकरूड ते पाचवड फाटा (कराड) या राज्य मार्गाच्या कामास एक वर्षापूर्वी सुरुवात झाली आहे. हा रस्ता कोल्हापुर जिल्ह्यातून पुढे कोकणातील राजापूरला जोडला जाणार आहे. मात्र, ७० वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीची भरपाईची कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देता न आल्याने आजही शेकडो शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळालेली नाही. गेल्या १५ वर्षांपासून भू-संपादनाचे एकही पत्र शेतकऱ्यांना आलेले नाही. तसेच शेकडो लोकांची लाखो रुपये थकबाकी शासनाकडून येणेबाकी आहे.
यातच नव्याने कोकरूड ते पाचवड फाटा (कराड) या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. हा रस्ता २२ मीटर एवढ्या रुंदीचा होणार आहे. त्यामुळे पूर्वी आकारणी केलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र या रस्त्यात जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच या मार्गाचे भूमिअभिलेख यांच्यामार्फत अद्याप येथील जमिनीची मोजणी करण्यात आली नसून, सध्या कंपनीच्या कामगारांमार्फत खासगी मोजणीचे काम सुरू आहे. मात्र, याच रस्त्यासाठी पूर्वी गेलेल्या शेतकऱ्यांचे भरपाई येणेबाकी असताना नव्याने करण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन गेली आहे.
कोट
कोकरुड ते येणपेपर्यंतच्या रस्त्यासाठी जमिनी ७० वर्षांपूर्वी संपादित केल्याने शेकडो लोकांचे वाटणीपत्र, खरेदी पत्र, वारस नसल्याने तसेच किरकोळ वादात अडकलेल्या शेतकऱ्यांचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत. पुन्हा रुंदीकरणाने उरली-सुरली जमीन रस्त्यात गेली असून, मागील थकबाकी आणि आता नव्याने गेलेल्या जमिनीची नुकसानभरपाई चालू दराने मिळावी.
-डॉ. प्रकाश पाटील