आशुतोष कस्तुरे पलूस : पलूस तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आणि डागडुजीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना वेळ नाही, तर ठेकेदाराला सवड मिळेना, अशी अवस्था आहे. खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे.तालुक्यातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम जमीन हस्तांतरणामुळे रखडले आहे.
शासन याबाबत ठोस भूमिका घेत नाही. रस्त्यावरून शेतकरी आणि संबंधित विभाग यांच्यामध्ये न्यायालयात खटला चालू आहे. खटल्याचा निकाल लागेपर्यंत सामान्यांना मात्र येथे मरणयातना भोगाव्या लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे दिसत आहे.खड्डे भरण्यासाठी सामाजिक संस्थांनी आंदोलने केली. परंतु महामार्ग प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन जीवित हानीची वाट पाहत आहे काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत.काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता ए. जी. आडमुठे यांना विचारले असता, त्यांनी ११ तारखेला खड्डे भरण्यात येतील, त्यासाठीची पूर्ण तयारी झाली आहे असे सांगितले होते. परंतु बुधवारी त्याबाबत विचारले असता, लवकरच सुरु करु, असे पुन्हा उत्तर मिळत आहे.तालुक्यातील तुपारी, घोगाव, कुंडल, पलूस, बांबवडे ही मोठी गावे या महामार्गावर येतात. महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरांवर जवळपास धुळीचा थर जमला आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचा आजारही जडण्याची भीती वाटत आहे. या महामार्गामुळे येथील नागरिकांच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसानीमुळे तालुका किमान दहा वर्षे पिछाडीवर गेल्याची भावना व्यक्त होत आहे.