भागवत काटकर - शेगावदुष्काळी जत तालुक्यातील महसूल विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तालुक्यात एका तलाठ्याकडे दहा-बारा गावांचा कारभार आहे. याचाच गैरफायदा घेतला जात आहे. सर्वसामान्य लोकांची वेळेवर कामे होत नाहीत. बेळुंखी येथील तलाठी राजू कांबळे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. यानिमित्ताने जत महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला आहे. महसूल विभागातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची साखळी तयार होत असून ही साखळी तोडून सर्वसामान्यांना तहसीलदार दीपक वजाळे न्याय देतील का, असा सवाल केला जात आहे.गेल्याच आठवड्यात उमराणी (ता. जत) येथून मिरज तालुक्यात बदली झालेला तलाठी व बेळुंखी येथील तलाठी असे दोघेजण नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात सापडले आहेत. जत तालुका विस्ताराने मोठा, १२० गावे व ५४ वाड्या-वस्त्यांचा आहे. महसूल विभागात विविध कामासाठी शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात. वारसा नोंदी, खरेदी दस्त नोंदी, महसूल विभागातील विविध दाखले, ७/१२ व ८ अ खाते उतारे आदी कामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे यावे लागते. मात्र तलाठ्याकडे ५ ते १२ गावांपर्यंत कारभार असल्याने त्यांची मोबाईलवरच कामाबाबत विचारणा करावी लागते. काही तलाठी जत येथूनच कारभार करतात, तर काही सजाच्या ठिकाणी सापडले तर सापडतात. असा कारभार जत महसूल विभागाचा आहे. त्यामुळे कामे वेळेत व्हावीत ही प्रत्येकाची अपेक्षा असते. याचाच गैरफायदा घेत लोकांची आर्थिक लुबाडणूक केली जाते. नुकतेच जतच्या तहसीलदारांनी गौण खनिजाचे साठे जप्त करुन लाखो रुपयांचा दंड वाळू तस्करांना केले आहेत. मारुती विंड या पवनचक्की कंपनीने परवाना दिल्यापेक्षा जादा मुरुमाचे उत्खनन केले. महसूल विभागाने ३० लाख रुपयांचा मुरुम चोरल्याची फिर्याद दिली आहे.
जत महसूल सुधारणार कधी?
By admin | Published: July 17, 2014 11:29 PM