अशोक पाटीलइस्लामपूर : वाळवा-शिराळा तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुका राष्ट्रवादीच्या गटांमध्येच रंगल्या. काही ठिकाणी भाजपसह इतर पक्षांची ताकद दिसली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांचा अद्याप अंदाज नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे आमदार असले तरी सत्तेत नाहीत. त्यामुळे सर्वच नेते राजकारण विसरून नैमित्तिक कार्यक्रमात भेटीगाठी घेत दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहेत.इस्लामपुरातील एका विवाह सोहळ्यात शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती दिसली. जयंत पाटील यांची उपस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पाटील यांच्याकडे सध्या मंत्रिपद नाही. त्यामुळेच तेही अशा कार्यक्रमांत थांबताना दिसू लागले आहेत. अशा कार्यक्रमात विरोधकांना जवळ घेऊन गप्पांचा फड जमवण्यात त्यांचा हातखंडा आहे. शुक्रवारी या लग्नातही त्यांनी भाजपचे नेते राहुल महाडिक भेटताच दिलखुलास गप्पा मारल्या.इस्लामपूर, शिराळा विधानसभा मतदारसंघात दिवंगत नेते नानासाहेब महाडिक यांच्यानंतर राहुल आणि सम्राट महाडिक या बंधूंनी राष्ट्रवादी हाच विरोधक मानून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. परंतु इस्लामपुरात निशिकांत पाटील आणि शिराळ्यात सत्यजित देशमुख हेही भाजपमधील आपल्या गटाची ताकद दाखवत आहेत. इस्लामपूर मतदारसंघ अधिक मजबूत करण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न सुरू आहे. मतदारसंघात येणाऱ्या मिरज तालुक्यातील डिग्रज मंडलमधील सर्व गावांत आणि वाळवा तालुक्यातील गावांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या गावांमध्ये राहुल महाडिक, निशिकांत पाटील, संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार व हुतात्मा गटाने शिरकाव केला आहे. मागील काही विधानसभा निवडणुकांत जयंत पाटील यांच्या विरोधात दिवंगत अशोकदादा पाटील, वैभव नायकवडी, निशिकांत पाटील, गौरव नायकवडी यांची ताकद दिसली आहे. मात्र महाडिक बंधू त्यांच्या विरोधात थेट मैदानात उतरलेले नाहीत. त्यामुळे राहुल महाडिक यांची भेट आणि गप्पा चर्चेचा विषय ठरल्या.
जयंत पाटील जेव्हा राहुल महाडिकांशी गप्पा मारतात.., सांगलीत चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 3:29 PM