सांगली : मिरजेतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या समारोपावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत अस्सल पंजाबी व महाराष्ट्रीयन नृत्य अदाकारी सादर करीत पोलीस दल, गणेशभक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली. सर्वांनी पोलीसप्रमुखांच्या या उत्साही नृत्याला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.दरवर्षी मिरजेत दोन दिवस विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगतो. शेवटी कोणाचा गणपती विसर्जन करायचा यावरून संघर्षाची प्रथाही येथे पडली होती, मात्र पोलिस दलाने हा चुकीचा पायंडा मोडीत काढताना पोलीस दलाचा गणपती शेवटी विसर्जित करण्याची नवी परंपरा सुरू केली. त्यामुळे मिरवणुकीतील संघर्ष संपुष्टात आला.
या युक्तीला यश मिळाले. या नव्या प्रथेमुळे सोमवारी दुपारी विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलीस दलाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली. दुपारी अडिच वाजता हा सोहळा संपला, मात्र एकूणच यंदाचा हा सोहळा पोलीस दलाच्या उत्साही मिरवणुकीने यादगार बनला.शेवटच्या मानाच्या पोलीस दलाच्या गणेशमूर्तीला निरोप देताना हलगी, लेझीमचा खेळ सुरू झाला. प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या या वाद्यांची मोहिनी पोलीसप्रमुखांवरही पडली. पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यानी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीसप्रमुखांना विनंती केली. त्यांनी होकार दर्शविल्यानंतर काही पोलिसांनी त्यांना डोईवर घेतले.
डोईवर घेतल्यानंतर पोलीसप्रमुख शर्मा यांनी अस्सल पंजाबी पद्धतीने हात वर करीत नृत्यााविष्कार सादर केला. उपस्थितांनी टाळ्या-शिट्यांनी त्यांना दाद दिली. त्यानंतर खाली उतरून त्यांनी महाराष्ट्रीय न पद्धतीने लेझीमवरचा ठेका पकडला. या नृत्यानेही त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.