सांगली : तीन आसनी प्रवासी रिक्षांसह अन्य वाहनांवर सरसकट विलंब शुल्क रद्द करावे यासाठी गुरुवारी कडकडीत बंद सुरू असताना जयसिंगपूरहून सांगलीत आलेल्या रिक्षामध्ये प्रवासी पाहून आंदोलकांनी अचानक हल्लाबोल केला. यामध्ये तीन वर्षांची चिमुकली जखमी झाली. रिक्षाचालक त्याच्या आजारी पत्नीला उपचारासाठी आणताना हा प्रकार घडल्याचे समजताच आंदोलकांवर पश्चात्तापाची वेळ आली.रिक्षा संघटनांनी एकत्रित येऊन मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदमुळे सकाळपासून एकही रिक्षा रस्त्यावर धावताना दिसली नव्हती. यामुळे बसस्थानकात गर्दी होती. याचवेळी जयसिंगपूर येथील भिसे नामक रिक्षाचालक आजारी पत्नीला उपचारासाठी सांगलीत घेऊन येत होते. बंदमुळे काही रिक्षाचालक बसस्थानक चौकात थांबले होते. तेव्हा सांगलीत रिक्षा (एमएच १० एडब्ल्यू १९५) येत असल्याचे आणि मागे प्रवासी दिसत असल्याचे पाहून मागचा पुढचा विचार न करता रिक्षावर आंदोलकांनी हल्ला चढवला.त्यामुळे चालक चांगलाच भेदरला. तो विनंती करू लागला. तेवढ्यात रिक्षात असलेल्या चालकाच्या पत्नीने आणि मुलीने आरडाओरड केला. या तोडफोडीत रिक्षातील तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यास दुखापत झाली. त्यामुळे ती रडू लागली.यावेळी काही रिक्षाचालकांनी चौकशी केली असता रिक्षाचालक आपल्या पत्नीस उपचारासाठी सांगलीत आणत असल्याचे लक्षात आले. यामुळे आंदोलकांना पश्चात्ताप झाला. हा प्रकार समजताच भाजप नेते पृथ्वीराज पवार हे घटनास्थळी धावले. तत्काळ रिक्षाचालकाच्या कुटुंबास सिव्हिलमध्ये हलवले. तेथून खासगी हॉस्पिटलमध्ये मुलीचे सीटी स्कॅन करण्यात आले. पवार यांनी सर्व खर्च केला. त्यानंतर कुटुंबाला सुखरूप जयसिंगपूरला पाठवले.
आधी तोडफोड, मग चौकशी ..कडकडीत बंद असताना परजिल्ह्यातील एखादी रिक्षा सांगलीत येते म्हटल्यावर तसेच महत्त्वाचे कारण असू शकते, याचा आंदोलकांनी विचार करायला हवा होता. परंतु त्यांनी प्रथम रिक्षा फोडली, त्यानंतर चौकशी केली. त्यामुळे हा प्रकार पाहणाऱ्या काही नागरिकांनी या प्रकाराबाबत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.