सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. गरजूंच्या रोटीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केली असलीतरी जिल्ह्यात अद्यापही या धान्याचे वाटप सुरू झालेले नाही. धान्य वाटप सुरू करून दिलासा देण्याची अपेक्षा गरजूंकडून व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने कडक निर्बंधांची घोषणा करताना, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात दिल्यास दिलासा मिळाला आहे. काही घटकांना रोख रक्कम देण्यात आली आहे तर गोरगरीब घटकाला मोफत धान्य देण्यात येणार आहे. घोषणा होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापही त्याची अंमलबजावणी सुरू नाही. त्यामुळे धान्य वितरण सुरू करण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडून धान्य व इतर आदेश नसल्यानेही तांत्रिक अडचणी येत आहेत.
कडक निर्बंधामुळे लागू केलेल्या संचारबंदीची मुदत संपण्याची वेळी आली तरीही अजूनही धान्याचे वाटप न झाल्याने ग्रामीण भागात लवकर धान्य मिळावी, अशी मागणी होत आहे.
केंद्र सरकारनेही पुन्हा एकदा मोफत धान्याची घोषणा केली असलीतरी त्याचीही अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.
चौकट
एकूण कार्डधारकांची संख्या ४०५८७३
अंत्योदय कार्डधारकांची कुटुंब संख्या ३१३६५
प्राधान्य कुटुंब कार्डसंख्या ३७४५०८
चाैकट
गहू,तांदूळ मिळणार मोफत
शासनाने गरजू घटकाला मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार गहू व तांदूळ अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणार आहे. यात दोन किलो गहू तर तीन किलो तांदूळ देण्यात येणार आहे.
कोट
शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासनाला आताच याबाबतचे आदेश मिळाले आहेत. तातडीने यावर कार्यवाही करून धान्याचे वाटप सुरू करण्यात येईल.
वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी
कोट
कोरोनामुळे अगोदरच रोजगाराच्या अडचणी आहेत. त्यामुळे राज्य शासननो आम्हाला दिलासा दिला आहे. आता फक्त मोफत धान्याचे वितरण व्हावे. हीच अपेक्षा आहे. काम नसल्याने लवकरात लवकर ही सुविधा मिळावी.
सिताराम ढोले
कोट
मोफत धान्य मिळणार म्हणून केवळ माहिती मिळाली आहे. मात्र, अद्यापही मिळाले नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग जादा असल्याने आम्हीही गेलो नाही मात्र, लवकर धान्य मिळावे ही मागणी आहे.
तम्माण्णा चौगुले
कोट
गेल्या महिनाभरापासून रोजगार थांबला आहे. आठवड्यात एखाद्या दिवशीच रोजगार मिळत आहे. त्यामुळे शासनाने घोषणा केलेल्या धान्याचे वाटप करून आम्हाला दिलासा द्यावा.
सुदाम खोत