बोरगाव : वाळवा तालुक्यातील भवानीनगर ते गणेश खिंडी चिंचणी असा घाटमाथ्याला जोडणारा भुयारी रस्ता अपुरा आहे. या भुयारी मार्गसाठी निधीची तरतूद असतानाही गेल्या ६० वर्षांपासून कामे अपूर्ण आहेत. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
भवानीनगर ते गणेश खिंडी चिंचणी असा घाटमाथ्याला जोडणारा भुयारी रस्ता आजही अपुरा आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होताे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर कंबरेएवढे पाणी असते. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची वाहने बंद पडून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तत्कालीन भाजप सरकारने २०१८-१९च्या अर्थसंकल्पात या भुयारी मार्गासाठी तीन कोटी ८० लाख ३२ हजारांची विशेष तरतूद केली आहे. मात्र, निधीची तरतूद असूनही रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. हा भुयारी मार्ग करण्यासाठी रेल्वेनेही हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वे प्रशासनाने राज्य शासनाला व ग्रामपंचायतीला ना हरकतीचे पत्रही दिले आहे. तरीही घाटमाथ्याला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या प्रलंबित कामात लक्ष घालून कामाला गती देण्याची गरज आहे.
कोट
गेली ६० वर्षे जनता भुयारी मार्गासाठी लढत आहे. यात राजकारण न आणता त्वरित रस्त्याचे काम सुरू करावे. यासाठी ग्रामपंचायतीने सतत पाठपुरावा करुन भुयारी रस्त्याच्या कामाला गती देण्याची गरज आहे.
- राहुल वाकळे, युवक सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, वाळवा.