सांगली : कोरोना संकटातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील मृत झालेल्या ५७४ कर्जदार रुग्णांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. पण, प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यात शासनाने मृत ५७४ कर्जदारांना कर्जमुक्त करण्याबाबत कोणतेच धोरण जाहीर केलेले नाही. यामुळे थकीत कर्जाचा डोंगर २३ कोटी ८४ लाखांवर गेला आहे.
कोरोनाने अनेक घरातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. कमवता माणूस गेल्याने आर्थिक झळ बसली. आता सोसायट्या, बँकांतून घेतलेले पीककर्ज, पतसंस्थांचे कर्ज याच्या वसुलीसाठी तगादा सुरू आहे. यामुळे संबंधित कुटुंबातील लोक मेटाकुटीस आले आहेत. या कर्जापायी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबावर बेघर आणि भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या कर्जाबाबत माहिती मागविली आहे. पतसंस्थांनी बँकांची नाव, कोरोनाने मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव, मंजूर कर्जाची रक्कम, तारण मालमत्तेचा तपशील, थकीत कर्जाची एकूण रक्कम याची माहिती सहकार आयुक्तांना पाठविली आहे. पण, अद्याप कर्जमाफीचा कोणताच निर्णय नसल्यामुळे मृत कर्जदारांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या कर्जाबाबत सहकार आयुक्तांनी माहिती मागविली आहे. त्यानुसार जिल्हा बँका, नागरी बँक, पतसंस्था यांना पत्र दिले आहे. संकलित झालेली माहिती आयुक्तांकडे पाठविली असून शासनाकडून कर्जमाफीबद्दल अद्याप आदेश नाही.-मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक.