सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांसह शेतकरी रस्त्यावर उतरले तरीही, आवर्तनाचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. खा. संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न करून ‘म्हैसाळ’सह जिल्ह्यातील तीन पाणी योजनांसाठी ५० कोटींचा निधी मिळविला. या घडामोडीस आठ दिवस झाले तरीही अद्याप पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ‘म्हैसाळ’च्या निधीचा ‘धनादेश’ वठणार कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टंचाई परिस्थिती अधिकच तीव्र होऊ लागल्याने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. वाढत्या थकबाकीमुळे प्रशासनाने, शेतकºयांनी काही रक्कम भरावी, असे आवाहन केले होते. मात्र, यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामुळे योजनेपुढील अडचणीत वाढ झाली आहे. आवर्तनाच्या मागणीसाठी कॉँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले आहे.
शासनाच्या निधीतून थकबाकी भरून पाणी सुरू करण्याची मागणी होत असली तरी, त्यास सरकारचा प्रतिसाद मिळत नाही. तरीही खा. संजय पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, योजना चालू करण्याची विनंती केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनेची थकबाकी भरण्यासाठी ५० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. मात्र, यास आठ दिवस होऊनही अद्याप हा निधी पाटबंधारे विभागास मिळालेला नाही.
दुसरीकडे कॉँग्रेस व राष्टÑवादीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून, हे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचे भाजपचे पदाधिकारी म्हणत असल्याने राजकीय पक्षांत कलगीतुरा रंगला आहे.प्रशासकीय पातळीवर तीन-चार दिवसांचा कालावधी जात असल्याचा बचाव भाजप कार्यकर्ते करत असले तरी, अद्याप निधी मिळाला नसल्याने पाणी सुटणार तरी कधी? हा सवाल कायम आहे. याबाबत अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी योजना सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याचे सांगितले.शासनाची घोषणा : माहिती कोणाकडे?पन्नास कोटींच्या निधीची घोषणा होऊन आठ दिवस झाले तरीही अद्याप निधी मिळाला नसल्याबाबत व निधी मिळण्याची प्रक्रिया कुठंपर्यंत आली, याची माहिती घेण्यासाठी खा. संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.