सांगली : महापालिकेकडील बदली कामगार, मानधन व रोजंदारीवरील कामगारांचे गेल्या पाच महिन्यांतील भविष्य निर्वाह निधीची एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम संबंधित कार्यालयाकडे जमा झालेली नाही. ही रक्कम गेली कुठे?, असा सवाल महापालिका कामगार सभेचे सहसचिव विजय तांबडे यांनी केला आहे. दरम्यान, ही रक्कम गुरुवारपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे कामगार कार्यालयातून सांगण्यात आले.
तांबडे म्हणाले, महापालिकेकडील बदली, मानधन व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी दरमहा पगारातून कामगारांचा हिस्सा १२ टक्के व महापालिकेचा हिस्सा १३.३६ टक्के याप्रमाणे रक्कम प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडे जमा करण्याची तरतूद कायद्यात आहे. सप्टेंबर २०२० पासून कर्मचाऱ्यांची कपात केलेली रक्कम व महापालिकेचा हिस्सा त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. पाच महिन्यांची ही रक्कम १ कोटी २१ लाख रुपये आहे. याबाबत प्रॉव्हिडंट फंडाच्या कार्यालयाकडे तक्रार केली आहे. फंडाची रक्कम, त्यावरील व्याज व दंड महापालिकेकडून वसूल करून ते कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणीही केल्याचे तांबडे यांनी सांगितले.
कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी आल्या होत्या. आता या कर्मचाऱ्यांच्या रकमेची चलने तयार करून लेखा विभागाला पाठविली आहेत. गुरुवारी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. यापूर्वी दरमहा ही रक्कम जमा होत होती. पण, कोरोनामुळे तांत्रिक अडचणी आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.