सांगली : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे एकापाठोपाठ एक खासगी रुग्णालये अधिग्रहित करून त्यांचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर होत आहे. त्यामुळे कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णांनी मग जायचे तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सांगली जिल्ह्यात कोविडचे उपचार घेणारे रुग्ण आता साडे आठ हजाराच्या घरात आहेत. बेडची मोठ्या प्रमाणात सोय असलेल्या मोठ्या खासगी रुग्णालयांची संख्या कमी आहे. त्यातच आता ही रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित होत आहेत. त्यामुळे नाॅन कोविड रुग्णांवरील उपचाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागीलवर्षीही अशीच परिस्थिती झाली होती. हृदयविकार असलेल्या, अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, थॅलेसेमिया अशा अनेक तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. यंदाही आता तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक खासगी रुग्णालयांचा, दंतचिकित्सकांचा नॉन कोविड रुग्णांवर लांबूनच उपचार करण्याकडे कल आहे. बऱ्याच खासगी रुग्णालयांना रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी परवानगी नाही. त्यामुळे तातडीच्या उपचाराची गरज असताना अशा रुग्णांना कोविड टेस्टसाठी अन्य ठिकाणी धावाधाव करावी लागते. त्यात वेळ गेल्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीत. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
चौकट
महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालये २५०
जिल्हा परिषदेकडील नोंदणीकृत रुग्णालये २९२
महापालिका क्षेत्रातील शासकीय रुग्णालये २
महापालिका क्षेत्रातील शासकीय कोविड रुग्णालये १
शासकीय रुग्णालयातील नॉन कोविड बेड ५००
महापालिका क्षेत्रातील खासगी कोविड रुग्णालये १७
चौकट
कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण ८३००
इतर आजाराचे रुग्ण २५००
चौकट
दररोज ४० रुग्णांना जावे लागते परत
विविध आजाराने ग्रस्त सुमारे ४० रुग्णांना दररोज खासगी रुग्णालयातून उपचाराअभावी परतावे लागते. काहींना केवळ दूर उभे करूनच औषधे दिली जातात.
चौकट
सतरा खासगी रुग्णालयांत कोविड उपचार
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात एकूण १७ खासगी रुग्णालयांत सध्या कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, श्वसनविकार, चेस्ट हॉस्पिटल, हृदयविकारावरील रुग्णालये, लहान मुलांची रुग्णालये आदींचा समावेश आहे. हृदयविकारावर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांकडील नियमितच्या रुग्णांना उपचार मिळणे यामुळे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर मिरज शासकीय रुग्णालयाचे दरवाजे आता नॉन कोविड रुग्णांसाठी बंद झाल्याने त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात यावे लागते. दहा किलोमीटरचा हा पल्ला त्यांना ओलांडावा लागतो. तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना खासगीत उपचार मिळाले नाहीत, तर त्यांना शासकीय रुग्णालयात यावे लागते. मात्र यामध्ये रुग्णांचा वेळ वाया जात आहे.
कोट
इनडोअर सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्टची परवानगी दिली तर तातडीच्या उपचारावेळी अशा रुग्णांची फरफट होणार नाही. त्याशिवाय ॲक्सिडेंटल रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल करू नये. या काही गोष्टी केल्या तर नॉन कोविड रुग्णांचे हाल होणार नाहीत.
- डॉ. शरद सावंत, शल्यचिकित्सक, सांगली
चौकट
दररोज अनेकांना परतावे लागते
हृदयविकाराचे, दातांचा आजार असलेले, अन्य संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असलेले, श्वसनविकार असलेले रुग्ण आता रुग्णालयातून उपचाराविना परतत आहेत. अनेक खासगी रुग्णालयांनी मात्र नॉन कोविड रुग्णांवरील सेवा सुरू ठेवली आहे.