शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पुराच्या पाण्यात बुडालेला संसार... घराच्या दारात पडलेला चिखल... भांडीकुंड्यासह अस्ताव्यस्त साहित्य पाहून पूरग्रस्त नागरिक, महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आभाळच फाटलंय, कुठं-कुठं ठिगाळ लावायचं, अशी व्यथा सांगलीतील मगरमच्छ काॅलनी, सूर्यवंशी प्लाॅट, दत्त नगर, काका नगर परिसरातील पूरग्रस्तांनी व्यक्त केली. या भागातील पूरग्रस्त आता घरी परतले असून, स्वच्छतेसाठी अगदी लहान मुलांपासून संपूर्ण कुटुंबच कामाला लागले आहे.
गेले चार दिवस निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी, दत्त नगर, काका नगर परिसरातील पूरग्रस्तांनी घराची वाट धरली आहे. या परिसरातील पुराचे पाणी कमी झाले आहे. पूरग्रस्तांना घराची दुर्दशा पाहून, काय करावे, हेच कळत नव्हते. सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी, दत्त नगर, काका नगर परिसराला पुराचा नेहमीच फटका बसतो. मोलमजुरी करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कच्च्या-पक्क्या घरांची वस्ती असलेल्या या भागातील नागरिक २०१९च्या महापुराच्या कटू आठवणी विसरून आता कुठे सावरले होते. त्यात पुन्हा महापुराने या परिसरात होत्याचे नव्हते केले आहे.
पुरात पत्र्याचीच घरे नव्हे, तर पक्की घरेही पूर्णत: बुडाली होती. आता पूर ओसरल्यानंतर या परिसरातील विदारक चित्र समोर येत आहे. रस्त्यावर, घरात मोठ्या प्रमाणात चिखल आहे. पुराच्या पाण्यातच घराची स्वच्छता सुरू आहे. महापालिकेचा पाणी पुरवठा सुरू झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. परंतु, घरातील मोडलेला संसार पाहून महिलांना अश्रू अनावर होत नव्हते. प्रशासनाने ५२ फुटापर्यंत पाणी पातळीची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार अनेकांनी साहित्य हलवले. पण सारेच साहित्य घराबाहेर नेणे शक्य नव्हते. त्यात ५५ फुट पाणी आल्याने सुरक्षित ठिकाणी ठेवलेले साहित्यही पुरात बुडाले. भांड्याकुंड्यांवर चिखलाचा थर होता. घरातील लाकडी कपाटांचेही नुकसान झाले आहे. अजूनही अनेक पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्रातच आहेत. घराची स्वच्छता करून ते पुन्हा निवारा केंद्रात परतत आहेत.
चौकट
स्वच्छतेचे आव्हान
शेरीनाला, नदीकाठच्या सखल भागात पाण्याने मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. मगरमच्छ काॅलनीत फूटभर चिखल आहे. तो हटविण्याचे काम करावे लागेल. दोन दिवसांपासून रस्त्यावर खराब झालेले साहित्य पडले आहे. ते उचलण्यासाठी कोणीच तिकडे फिरकलेले नाही. त्यामुळे तातडीने रस्त्यावर पडलेले साहित्य उचलावे, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. काही गल्ल्यांत महापालिकेने औषध फवारणी केली होती.