सांगली : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी मतदारांचा तुरळक प्रतिसाद जाणवत होता. अनेक बुथवर केवळ कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. काही ठिकाणी कार्यकर्ते सोशल मीडियावर, तर काहीजण नाष्टा करण्यात मग्न होते. आलेल्या मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानास जाता येत होते.शहरात अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट दुपारच्या सुमारास सुंदराबाई दडगे हायस्कूल व कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. बाहेर चोख पोलीस बंदोबस्त होता, तरी कार्यकर्तेही निवांतच होते. मतदान केंद्रापासून निर्धारित केलेल्या रेषेबाहेर टेबल टाकून बसलेले कार्यकर्ते निवांत होते. काही जणांचा नाष्टा चालू होता. तीच स्थिती रतनशीनगर येथील चंपाबेन महिला महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर होती. बाहेर काहीजण होते, तरी प्रत्यक्ष मतदानासाठी एक किंवा दोघेचजण दिसत होते.बाजारपेठेत तुरळक गर्दी सांगलीच्या प्रमुख बाजारपेठेत एरव्ही जिल्हाभरातून आलेली वाहने व व्यापाऱ्यांच्या गर्दीमुळे वाहन पुढे न्यायलाही अडचण होत असते. बुधवारी मात्र, दुकाने सुरू होती, पण व्यवहार कमी प्रमाणात सुरू होते. अनेक दुकाने बंदच होती. जी सुरू होती, ती ग्राहकांच्या प्रतीक्षेत होती. याच परिसरातील राणी सरस्वतीदेवी कन्या प्रशालेच्या मतदान केंद्राबाहेर कार्यकर्ते दिसत होते, पण प्रत्यक्षात मतदार कमीच होते.
हायस्कूल रोडवरील बहुतांश दुकाने बंद होती. या परिसरातील खानावळींतही कमीच गर्दी होती. तीच स्थिती मारूती रस्ता, हरभट रस्ता, कापड पेठ येथेही होती. सराफ बाजारात बहुतांश दुकाने बंद होती. शिवाजी मंडईत व्यापारी व ग्राहकांचीही गर्दी दिसून आली नाही.कोल्हापूर रस्त्यावर निवडणुकीचा मागमूसही नाही संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण तापले असताना, कोल्हापूर रस्त्यावर कोठेही निवडणूक असल्याचे वातावरण नव्हते. तेथे ना कार्यकर्ते दिसत होते, ना मतदार. त्यातच ह्यड्राय डेह्णमुळे या मार्गावरील सर्वच हॉटेल्स बंद होती. शंभरफुटी रस्त्यावरील सर्व वाहन दुरूस्तीची दुकाने सुरू होती. या भागातील काही मतदान केंद्रांवर मात्र कार्यकर्त्यांचा घोळका दिसून येत होता. शंभरफुटी रस्त्यावरून विश्रामबागपर्यंत पोलीस वाहनांची सारखी वर्दळ सुरू होती.खवय्यांची गोची शहरातील बहुसंख्य चहा, वडापाव व नाष्ट्याचे गाडे बुधवारी बंद होते. कॉलेज कॉर्नर परिसरात वडापाव, समोसा, ज्युसच्या गाड्यांवर मोठी गर्दी असते. बुधवारी या भागातील सर्व गाडे बंद होते. अशीच काहीशी स्थिती शहरभर होती. शहरातील प्रमुख चौकातील टपऱ्या, छोटी हॉटेल्स बंद असल्याने दुपारी खवय्यांची गोची झाली. टिळक चौक, मारुती रस्ता, बसस्थानक परिसर, झुलेलाल चौक परिसरातील हॉटेल्स सुरू होती. विश्रामबाग परिसरातील काही गाड्यांवर गर्दी असली तरी, नेहमीसारखे ग्राहक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कार्यकर्त्यांची पेटपूजा सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून मतदान केंद्राच्या बाहेरील बुथवरील कार्यकर्त्यांसाठी तिथेच नाष्ट्याची सोय केली होती. तास-दोन तासाने त्यांना नाष्टा पोहोच करण्यात येत होता. सकाळी शहरात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे कोणत्याही छताविना कार्यकर्ते मतदारांची वाट पाहत होते. वडापाव, व्हेज पुलाव, समोसा आदी पदार्थांवर कार्यकर्त्यांची पेटपूजा सुरू होती. टशन असलेल्या काही मतदान केंद्रांवर मात्र कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.