अशोक पाटील, इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळूनही युतीत सामील झालेल्या दलित पक्षसंघटना वाळवा-शिराळ्यात बॅकफूटवर आहेत. या संघटनांच्या नेत्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. त्यांचा प्रमुख नेता डॉ. विजय चांदणे सध्या तुरुंगाची हवा खात आहे, तर उर्वरित नेत्यांत ताळमेळ नाही. लोकसभेच्या प्रचारातही त्यांचे चेहरे कोठेच दिसले नाहीत. वाळवा तालुक्यात रिपब्लिकन पक्षाच्या अरुण कांबळे यांनी प्रारंभीच्या काळात आक्रमक होत दलित संघटना मजबूत केली, मात्र विविध प्रकरणांत तडजोडी करण्यात ते आघाडीवर असल्याचा आरोप पक्षातीलच काहीजण करतात. अलीकडे संघटनेतील नेतेबदलू धोरणामुळे त्यांची पीछेहाट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात ते कोठेच दिसले नाहीत. इस्लामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु सध्या हे काम ठप्प असून त्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या राजकारणात मुकुंद कांबळे हे दलित नेते म्हणून परिचित होते. ते सध्या पालिकेच्या राजकारणात नाहीत. त्यांनी मध्यंतरीच्या काळात अकादमी सुरू केली होती, परंतु सध्या ती बंद आहे. आता त्यांनी मूकबधिरांना न्याय देण्याचा पवित्रा घेतला आहे. दलित महासंघाच्या प्रा. मधुकर वायदंडे, प्रा. सुभाष वायदंडे यांनीही अलीकडे संघटना बांधणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सध्या ते दोघेही शिक्षण संस्थाचालकांच्या दावणीला बांधले गेले आहेत. शिराळा तालुक्यातील भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत कांबळे, कोकरुडचे विठ्ठल सोनवडे आपापल्या ताकदीवर मतदारसंघात छोटी-मोठी आंदोलने करीत आहेत. शिराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठी ११ गुंठे जागा उपलब्ध असतानाही, सत्ताधारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. मात्र या गोष्टीकडे याठिकाणच्या दलित नेत्यांचे फारसे लक्ष नाही. इस्लामपूर बसस्थानक परिसरात वावरणार्या डॉ. विजय चांदणे याने तर दलित संघटनेची अब्रू वेशीला टांगली. महिलांवर केलेल्या अत्याचाराचा पर्दाफाश झाल्याने सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे. या नेत्यांमुळे सध्यातरी वाळवा-शिराळ्यात दलित संघटनांची ताकद संपली आहे. संघटनेच्या नावाखाली फुटकळ कार्यकर्ते शासकीय कार्यालयात दमबाजी करून तडजोडी करताना दिसत आहेत.
दलित नेत्यांचा आवाज कुठे आहे?
By admin | Published: May 22, 2014 12:33 AM