मिरज : राज्यात राजकीय क्रांती घडल्याने अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला पेटीही बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोकी मिळाल्याचे सांगत आहेत. ठाकरे गटातील आणखी काही आमदार दसरा मेळाव्यात शिंदे गटात येण्याची शक्यता आहे, असा दावा आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.
मिरजेत वीर शिवा काशीद प्रवेशद्वाराचे उद्घाटन व गणेश तलाव येथे ७१ फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण कामगारमंत्री सुरेश खाडे व आमदार पाटील यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, ठाकरे व शिंदे सरकारमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असून, मुख्यमंत्री शिंदे गतीने कामे करत आहेत. राजकारणात शरद पवार मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीत कोणाला निवडायचे, हे जनता ठरवत असते.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती, हेसुद्धा विसरता येणार नाही. यावेळी कामगारमंत्री खाडे व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचेही भाषण झाले. मिरजेत गणेश तलाव येथे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ७१ फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण व मंगळवार पेठेत माळी गल्लीत प्रतिशिवाजी वीररत्न शिवा काशीद प्रवेशद्वाराचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
यावेळी भाजप नेते मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, सभापती निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी, मोहन वनखंडे, गणेश माळी, नगरसेविका अनिता वनखंडे उपस्थित होते.