सांगली : पेठ (ता. वाळवा) येथे तोडलेल्या लाकडाबद्दल कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच स्वीकारताना वनपालास रंगेहात पकडण्यात आले. वनपाल अमोल दत्तात्रय शिंदे (वय ३१) व लाकूड वखार चालक पांडुरंग रामचंद्र खुडे (वय ३७, रा. पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराने भाटशिरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील नीलगिरीचे झाडे तोडून विक्रीसाठी पेठनाका येथील यशवंत बॅकवर्ड क्लास सुतार औद्योगिक सह. संस्थेचा चालक पांडुरंग खुडे याच्या लाकूड वखारीत आणली होती. ट्रॅक्टरव्दारे आणलेल्या या लाकडावर कारवाई न करण्यासाठी शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयातील वनपाल अमोल शिंदे याने स्वत:साठी २ हजार रुपये तर वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांच्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. शिवाय प्रत्येक लाकडाच्या ट्रॉलीसाठी महिन्याला पाचशे रुपये देण्याचीही मागणी केली होती. लाकूड वखार चालकानेही वनपाल शिंदे यांना पैसे दे नाहीतर आमच्या वखारीत लाकडे आणू नकोस असे सांगितले होते.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेठ येथील लाकूड वखारीमध्ये सापळा लावला. यावेळी वनपाल शिंदे व खुडे यांनी लाचेची मागणी करून दीड हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरोधातही लाचलुचपत अधिनियमानुसार इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अविनाश सागर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.