सांगली : राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजप व शिवसेनेतील बंडखोर गटाचे सरकार येण्याचे संकेत मिळत असतानाच जिल्ह्यातील बंडखोर गटाचे आमदार अनिल बाबर व भाजपचे आ. सुरेश खाडे मंत्रिपदाच्या शर्यतीत आले आहेत. दोन्ही पक्षातील दोन ज्येष्ठ आमदारांना आजवर मंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिल्याने यावेळी त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्यात शिवसेना बंडखोर आमदारांचा गट व भाजप यांचे सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सत्तास्थापनेत बंडखोर गटाला चांगली खाती व अनेक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. भाजप व शिवसेना युती सरकार स्थापन झाल्यानंतर २०१४ मध्येही शिवसेनेकडून आ. बाबर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. त्याचवेळी भाजपचे आ. सुरेश खाडे यांचेही नाव चर्चेत होते. युतीच्या काळात या दोघांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. आता नवे सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असतानाच मंत्रिपदाचीही चर्चा पुन्हा रंगली आहे.
मतदारसंघांचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधीत्त्व करताना मंत्रिपदासाठी प्रदीर्घ काळ दोघांनाही प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये आता दबाव टाकून मंत्रीपदे पदरात पाडण्याची संधी असल्याने बाबर व खाडे यांचे समर्थक तसेच त्यांच्यावर मर्जी असलेले वरिष्ठ नेते यांच्याकडून ताकद लावली जाणार आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर मतदारसंघातील प्रलंबित कामे करून पुन्हा पुढील निवडणुकीसाठी ताकद वाढविण्याचे काम करण्याचे त्यांचे मनसुबे असतील.
दोन्ही आमदारांची चौथी टर्म
आ. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. १९९०, १९९९, २०१४ व २०१९ या चार निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. दुसरीकडे आ. सुरेश खाडे हे सुरुवातीला जतचे प्रतिनिधित्व करून आता मिरजेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. २००४ मध्ये जत मतदारसंघात, तर २००९, २०१४ व २०१९ या निवडणुकांत मिरज मतदारसंघातून यश मिळविले आहे.
अडीच वर्षात दोन्ही आमदारांची कोंडी
एकीकडे सत्तेत असूनही आमदार अनिल बाबर यांची मतदारसंघातील कामे रखडल्याने ते नाराज आहेत, तर दुसरीकडे विरोधात असल्याने आ. खाडे यांची मिरज मतदारसंघातील अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे मंत्रीपद मिळविण्यासाठी दोघेही प्रयत्नशील राहतील. मंत्रीपदाची अपेक्षा करीत नसल्याचे आ. बाबर सांगत असले तरी त्यांच्या समर्थकांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे.