सांगली : काँग्रेसला संपविण्यासाठी राष्टय स्वयंसेवक संघाची मदत घेणाºया आणि भाजपला जवळ करणाºया जयंत पाटील यांचे समविचारी नक्की कोण आहेत, असा सवाल काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने गुंड, भ्रष्टाचाऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, स्वत:च्या पक्षवाढीसाठी काँग्रेसची मदत घ्यायची आणि आतून भाजपशी हातमिळवणी करायची, हेच जयंतरावांचे राजकारण आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जयंतरावांचा सांगलीत सत्कार झाला. यावेळी त्यांनी समविचारी पक्षांनी महापालिका निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले होते. खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी येथे समविचारी नाहीत. २००८ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपशी
महाआघाडी करून काँग्रेसची सत्ता संपवली होती. त्यावेळी जयंतरावांनी संघाच्या आणि भाजपच्या उमेदवारांचा प्रचार घरोघरी जाऊन केला होता. भाजपला उपमहापौरपद, स्थायी समितीचे सभापतीपद दिले होते. संभाजी पवार आणि भाजपची त्यांनी अनेक वर्षे साथसंगत केली. नेहमीच भाजपशी जवळीक साधणाऱ्या जयंतरावांचे समविचारी नक्की कोण आहेत? जयंतरावांनी याबाबत आम्हाला पटवून द्यावे.
महापालिकेच्या मागील निवडणुकीवेळी आर. आर. पाटील गृहमंत्री होते. मात्र राष्ट्रवादीने अनेक गुंडांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आर. आर. आबांनाही दरवेळी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गुंड आहेत की नाही, हे तपासून यावे लागले होते. आताही राष्टवादी तशा लोकांना उमेदवारी देईल. त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करावी का? भले काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाही तरी चालतील, पण यांची सोबत आम्हाला नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीत काँग्रेसने नव्या, स्वच्छ चेहºयांना संधी द्यावी, असा आपला आग्रह आहे. गुंड, भ्रष्टाचारी आणि वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत. तरीही त्यांना उमेदवारी दिली, तर आपण त्यांचा प्रचार करणार नाही. या निवडणुकीत नेतृत्व कोणीही करो, पण चांगले उमेदवार द्यावेत. अनेकांनी महापालिकेत मक्तेदारी तयार केली आहे. त्यांनी महापालिकेची लूट केली आहे. त्यांना लोक कंटाळले आहेत. केवळ निवडून येण्याची क्षमता, एवढ्या पात्रतेवर त्यांना उमेदवारी देऊ नये. अन्यथा ते पक्ष संपवतील.
ते म्हणाले, मिरजेत मेळाव्यामध्ये मी जाहीरपणे बोललो आहे. वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. पक्षात नव्याने येणाºया तरुणांना संधी मिळाली पाहिजे. मूठभर प्रस्थापितांना आणि पक्षासाठी काहीही न करणाºयांना आता बाजूला करावे. त्यांचे दबावाचे राजकारण चालवू देऊ नये.सुधीर गाडगीळांनी आता बोलावे!काँग्रेसने नाकारलेल्या, संधीसाधू भ्रष्टाचारी, मक्तेदारांना आता भाजप जवळ करू पाहत आहे. स्वच्छतेच्या आणि साधनशूचितेच्या गप्पा मारणाºया भाजपने अशा लोकांना तिकीट देणार का, हे आता जाहीर करावे. सध्या भाजपकडून सत्तेचा आधार घेऊन गुन्हेगारांना खटल्यातून सोडवणे, कारवाईतून वाचवणे सुरू आहे. हे फक्त निवडणुका जिंकण्यासाठी केले जात आहे. भाजपला हे कसे काय चालते, याचे उत्तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी द्यावे. मागील विधानसभा निवडणुकीत जयंतरावांच्या इशाऱ्यावर राष्ट्रवादीने गाडगीळांना मदतीचा हात दिला होता. महापालिका निवडणुकीतही तेच होणार आहे, असेही शेवटी विशाल पाटील यांनी सांगितले.